उस्मानाबाद :- निसर्ग हा सर्वांचा आहे. त्यामुळे निसर्गाचे आणि पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे ही  आपल्या प्रत्येकाची  जबाबदारी आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. वृक्षलागवड आणि त्यांची जोपासना या माध्यमातून प्रत्येकाने निसर्गाशी जवळीक साधावी,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी  डॉ. के.एम. नागरगोजे यांनी केले.
    येथील विभागीय वनाधिकारी कार्यालयाच्यावतीने आज जागतिक वनदिनानिमित्त एका कार्यक्‌रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. नागरगोजे बोलत होते. अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री. शेख, विभागीय वन अधिकारी  श्री.गुंजकर, यशवंत किसान विकास मंचाचे  अध्यक्ष गोकुळ शेळके आणि श्रीअंबवा महिला मंडळ संस्थेंच्या अध्यक्षा कस्तुरबाई कारभारी आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे आणि प्रमुख उपस्थितांच्या हस्ते संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत सन 2012-13 मधील जिल्हास्तरीय वनग्राम समिती, वन्य जीव सप्ताहानिमित्त आयजित निबंध,चित्रकला आणि वक्तृत्व  स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे म्हणाले की,सध्या आपण भौतिक प्रगतीच्या मागे लागलो आहोत त्यामुळे वन व पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. याचबरोबर याचा धोका वन्य जीवांपर्यंतही पोहोचला आहे. भूगर्भातील शेकडो वर्षापूर्वीचे पाणी उपसा होत असल्याने भूगर्भातील पाणीसाठा संपत चालला आहे. या सर्व प्रकाराची आपण जाणीव ठेवली पाहिजे. एकेकाळी हवा, पाणी यासाठी प्रसिध्द असलेला आपला  जिल्हा सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहे. अशावेळी सर्वांनी आपली सामाजिक जबाबदारी आणि दायित्व  ओळखून पुढे आले पाहिजे. वनग्राम समित्यांमार्फत चांगले काम करणाऱ्या गावांनी आपली भूमिका आसपासच्या गावांनाही पटवून दयावी, जेणेकरुन पर्यावरण संवर्धनाचे काम अधिक व्यापक र्होईल असे  त्यांनी सांगितले.
    संत तुकाराम वनग्राम योजनेतील पखरुड, नांदगाव आणि शेलगाव या वनग्राम समित्यांचे पदाधिकारी,वनपाल,वनसंरक्षक आणि संबधित गावकऱ्यांचे डॉ. नागरगोजे यांनी कौतूक केले. या वनग्राम समित्यांना अनुक्रमे 51 हजार, 31 हजार आणि 11 हजार रुपये आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनाही प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
      गुंजकर यांनी यावेळी संत तुकाराम वनग्राम योजना आणि जागतिक वनदिन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली. जागतिक वन दिनानिमित्त्‍वनपरिक्षेत्र कार्यालय उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे आणि प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
       यावेळी वनसंरक्षणाचे आणि संवर्धनाचे चांगले काम करणा-या भूम तालुक्यातील नागेवाडीचे विभिशन ठोंबरे आणि तुरकुट येथील बापूराव कावळे यांनी मनोगत व्यक्त केले. निबंध स्पर्धेतील विजेते  प्रिया रणदिवे आणि मोहन फड यांनीही आपले विचार मांडले. श्रीमती कारभारी यांनी वनसंवर्धनात महिलांचा सहभाग यावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.व्ही. बेडके यांनी केले तर श्री. परळकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमास तुळजापूर,भूम,उमरगा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, मंडळ अधिकारी, वनपाल, विद्यार्थी व नागरीकांची मोठी उपस्थिती होती
 
Top