सोलापूर -: जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता कृषी विभागांनी किमान 10 हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशा सूचना राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी दिल्या.
     येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी, आ. दिलीपराव माने, माजी मंत्री आनंदराव देवकाते, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     यावेळी विखे- पाटील यांनी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या मनरेगाच्या सुरु असलेल्या कामाची व त्यावरील मजूर उपस्थितीची माहिती घेतली. जिल्ह्यातील कृषी विभागाची कामे वाढविण्याच्या सूचना दिल्या. याबाबत कृषी सहायक, पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून सकारात्मक काम होणार नाही. त्यांचा अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांना दिल्या.
    जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या आत्मा समितीच्या बैठका सर्व तालुका स्तरावर जावून त्वरित घेण्याच्या सूचनाही विखे - पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतक-यांना बांधावर खत देण्याकरिता किती गट स्थापन झाले आहेत याची माहिती घेवून याबाबत काय नियोजन केले याबाबत विचारणा केली.
   यावर्षी 80 टक्के खत बांधावर देण्याचे उद्दीष्ट असल्याचे विखे - पाटील यांनी सांगितले. तसेच कृषी विभागाच्या फळबाग शेततळे व विविध कामांचा आढावा घेण्यात आला..
   या बैठकीस विविध तालुक्याचे आत्मा समितीचे अध्यक्ष, सदस्य, कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top