उस्मानाबाद :- राज्यातील पशुधन जगले पाहिजे यासाठी शासनाने  राज्यात जनावरांसाठी 800 छावण्या उभारल्या असून तेथे दररोज एक कोटी लिटर दुध संकलन होत आहे. ही किमया टंचाईग्रस्त भागात छावण्या उभारल्यामुळेच  साधता आली. जनावरे जगली पाहिजेत यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेवून जेथे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी चारा छावण्यास उभारल्यास शासन त्यांना 15 दिवसात निधी उपलब्ध करुन देईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
    उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग अनुदानाचे धनादेश वितरण कार्यक्रम चव्हाण यांच्या हस्ते झाला. त्यावेळी  ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, अप्पासाहेब पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण सरडे, ब्रिजलाल मोदानी, नितीन बागल, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, तालुका कृषी अधिकारी एस. पी. जाधव, प्र. तहसिलदार श्री. जाधव, सरपंच शालनताई कसबे, कल्पना मगर, दत्ता शेळके आदिंची यावेळी  उपस्थित होते.
    पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्हयात अपुरा पाऊस झाल्याने जनतेस व जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपुऱ्या पावसामुळे फळबागा नष्ट होत आहेत. तेव्हा नवीन विहीरीची कामे घेवून रिकाम्या हाताला रोजगार उपलब्ध करुन  दिल्यास शासनातर्फे निधी  देण्यात येईल. शेतकऱ्यांनी शेतीला जेाडुनच पशुपालन, दुधव्यवसाय करुन आपली  आर्थिक उत्न्नती साधावी. वाघोली गावचा पिण्याच्या  पाण्याचा प्रश्न कायमचा  सोडविण्यासाठी  पेयजल योजनेत गाव समाविष्ट करण्यात येईल मात्र कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष  देण्याची आवश्यकता  त्यांनी व्यक्त केली.
    दुष्काळग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून शासन गावच्या विकास कामासाठी निधी मंजूर करते. प्राप्त  निधीचा योग्य विनियोग करुन गावचा विकास साधावा. शासनाचा प्रतिनिधी या नात्याने ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणी समजावून घेवून जागच्या जागी प्रश्न निकाली काढण्यासाठी भेट देत आहत. तेव्हा जनतेनीही आपले प्रश्न मांडल्यास तात्काळ ते निवारण करण्याचा आपला प्रयत्न असेल,असे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. 

पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण
    केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राष्ट्रीय फळबाग योजनेअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यात 2 हजार 180 हेक्टर फळबागेचे क्षेत्र असून लाभार्थ्याची  संख्या 3 हजार 132 आहे. सूकत चाललेल्या फळबागासाठी  प्रतिहेक्टरी 30 हजार मंजूर असून त्यापैकी  त्याचा  पहिला हप्ता 15 हजार प्रमाणे 3 कोटी 27 लाख इतक्या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.  शेतक-यांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे, असा सल्ला श्री. चव्हाण यांनी उपस्थित शेतक-यांना दिला. यावेळी त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
    याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाधयक्ष संजय पाटील दुधगांवकर म्हणाले वाघोली गावच्या विकासासाठी जिल्हा परिषदेतर्फे आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.
    उपसरपंच सतिश खडके यांनी गावच्या विकास कामाचे निवेदन श्री. चव्हाण यांच्याकडे सादर केले. कार्यक्‌रमास वाघोली व परिसरातील नागरीक, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत  व विविध सेवा सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top