सांगोला (राजेंद्र यादव) :- शेतकरी सहकारी सूत गिरणी मर्यादित, सांगोले या संस्थेच्यावतीने सूत गिरणीच्या प्रांगणात सोमवार दि. 20 मे रोजी दुपारी 12.35 वाजता सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत गिरणीचे चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे यांनी दिली.
      शेतकरी सहकारी सूत गिरणी मर्यादित, सांगोले या संस्थेच्यावतीने सन 1989 पासून दरवर्षी अखंडपणे सामुदायिक विवाह सोहळा पार पाडला जात आहे. सन 1989 पासून सन 2012 पर्यंत 803 जोडप्यांचे विवाह पार पडलेले आहेत. तसेच सन 2004 पासून 2012 पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून राबविल्या जाणा-या कन्यादान योजनेंतर्गत आणि महिला व बालविकास कार्यालयामार्फत राबविल्या जाणा-या शुभ मंगलविवाह योजनेंतर्गत दहा हजार रूपये पर्यंतचे अनुदान एकूण 251 जोडप्यांना देण्यात आले आहे. सदर सामुदायिक विवाहमध्ये सहभागी होणा-या वधु-वरांना संपुर्ण पोशाख, संसारोपयोगी भांडी, लग्नाचे धार्मिक विधीचे साहित्य, प्रत्येक बाजूच्या 30 माणसाची जेवणाची व्यवस्था मोफत केली जाते. 30 पेक्षा जास्त लोक असतील तर अल्प मोबदल्यात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सदर विवाहमध्ये भाग घेणा-या वराचे वय 21 वर्षे व वधुचे वय 18 वर्षे पुर्ण असल्याचा दाखला बंधनकारक असून सदर विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणा-या वधु-वरांनी शनिवार दि. 20 एप्रिल पर्यंत संस्थेच्या टाईम ऑफीस विभागात नाव नोंदणी करावी. तरी सदर विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त वधु-वरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळांनी केले आहे.
 
Top