बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : पश्चिम महाराष्‍ट्रातील पहिल्‍या कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे भूमिपूजन व महाराष्‍ट्र कृषी पणन मंडळ आणि लक्ष्‍मी कृषी उत्‍पादने विकास पणन संस्‍था यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने उभारलेल्‍या मॉडर्न मार्केट प्रकल्‍पाच्‍या शीतगृह सुविधा केंद्राचे उदघाटन मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी कृषी व पणनमंत्री ना. राधाकृष्‍ण विखे-पाटील यांच्‍या हस्‍ते होत असल्‍याची माहिती माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेस बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अरुण दादा बारबोले, माजी नगरसेवक रावसाहेब मनगिरे, अभिजीत अशोक राऊत आदी मान्‍यवर उपस्थित होते.
    हा कार्यक्रम व्‍यापारी दिलीप खटोड यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होत असून महाराष्‍ट्र राज्‍याचे पणन संचालक किशोर तोष्‍णीवाल साहेब, बँक ऑफ महाराष्‍ट्राचे ऑंचलिक प्रबंधक अनिल बी पाटील, राष्‍ट्रीय कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बाळासाहेब शेळके, माजी नगराध्‍यक्ष विश्‍वास बारबोले, उद्योगपती शिवाजीराव डिसले शेठ, वैरागचे सरपंच संतोष निंबाळकर, पंचायत समितीच्‍या सभापती कौसल्‍याताइर् माळी, जिल्‍हा परिषदेचे विरोधी पक्षनेते संजय पाटील, पंचायत समितीचे उपसभापती (बापू) घोगरे, कॉंग्रेसचे तालुकाध्‍यक्ष अँड. सुभाष जाधव आदी मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत.
    यावेळी बोलताना राऊत म्‍हणाले, बार्शी शहरातील उद्योग व व्‍यापाराचा पूर्वीप्रमाणेच नावलौकिक होण्‍यासाठी खाजगी तत्‍वावरील कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची स्‍थापना केली. पंधरा एकरचे मोठे क्षेत्र उपलब्‍ध करुन दिले आहे. यात कडधान्‍ये, तेलबिया, शेतीमाल, फळांचा बाजार, कडबा बाजार, जनावरांचा बाजार इत्‍यादी सर्व प्रकारच्‍या मालासाठी स्‍वतंत्र व्‍यवसथा करण्‍यात आली आहे. संपूर्ण क्षेत्राला कुंपन भिंत तसेच अंतर्गत रस्‍त्‍याचे काम पूर्ण झाले असून लिलाव शेड, वजनकाटा, गोदाम, व्‍यापारी गाळे, विजेची व्‍यवस्‍था, पिण्‍याचे व जनावरांच्‍या पाणीची सुविधा हमाल व शेतकरी निवास व अल्‍पदरात भोजनाची सुविधा इत्‍यादी प्रकारच्‍या सोयीसुविधा उपलब्‍ध करण्‍यासाठी नगररचना विभाग, नगरपालिका, जिल्‍हाधिकारी आदी प्रकारच्‍यासह पणन विभागाकडून रितसर मान्‍यता मिळाली आहे. व्‍यापारी गाळ्यासंदर्भात बांधकामाचे 80 गाळांचे तीन टप्‍पे केले असून प्रत्‍येक गोळा हा 20 बाय 60 फुट क्षेत्राचा देण्‍यात येणार आहे. त्‍यांच्‍या मागणीनुसार व्‍यापा-यांना उपलब्‍ध करण्‍यात येतील. आजपर्यंत खुनशी राजकारण करुन काही व्‍यापा-यांची लायसन रिनीव्‍ह झाली नाहीत. व्‍यापा-यांच्‍या दुकानाची नावे खोडायला लावली परंतु. आपण व्‍यापारात कसलेही राजकारण न करता प्रत्‍येक व्‍यापा-यांना कसल्‍याही प्रकारचा धोका अथवा त्रासाशिवाय शांततेत व्‍यापार करण्‍यासाठी तसेच नवनवीन व्‍यापा-यांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न करणार आहोत. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्‍या बार्शीचे व्‍यापाराचे पूर्वीचे वैभव प्राप्‍त करुन चांगल्‍या प्रकारचे नाव होण्‍यासाठी या बाजार समितीमध्‍ये धान्‍य स्‍वच्‍छ करण्‍याच्‍या तीन मशिन, वजनकाटा इत्‍यादी सर्व सुविधांनी शेतक-यांच्‍या मालाला जादा दर मिळवून देण्‍याचा प्रयत्‍न करणार आहोत.
    या खाजगी बाजार समितीमध्‍ये व्‍यापा-यांना निर्भय वातावरण असून कोणाला कसलाही जाच, त्रास मारहाणी, बळजबरी, दडपशाही, धोका होणार नाही. व्‍यापा-यांना अत्‍यंत चांगल्‍या वातावरणात आपला व्‍यवसाय वृध्‍दीगंत करण्‍यास मुभा असणार आहे. तसेच कोणत्‍याही शेतक-यांची फसगत होणार नाही. कोणाचा काटा मारला जाणार नाही. कोणाच्‍या मालाची किंमत कमी होणार नाही. शेतक-यांची हक्‍काची बाजारपेठ अशी ओळख यापुढे बार्शीचा नावलौकीक होणार आहे.
 
Top