उस्मानाबाद -: मुख्यमंत्री सहायता निधी (दुष्काळ) साठी सहकारी व खासगी दूध संघ व दूध प्रक्रिया प्रकल्पधारक यांच्याकडून 3 कोटी 5 लाख 35 हजार 969 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सुपूर्द केला.  याप्रसंगी ना. चव्हाण यांनी दुग्धविकास विभागाकडून आणखी किमान 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा होतील असा विश्वास व्यक्त केला.
              राज्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेता दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी सहकारी व खासगी दूध व दूध प्रकल्पधारक यांच्या समवेत 20 मार्च 2013 रोजी बैठक आयोजित केली होती. टंचाईच्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले होते.  या आवाहनाला सर्वांनी प्रतिसाद दिला. फेब्रुवारी 2013 या महिन्यात संकलित झालेल्या एकूण दूधाच्या सरासरीत एका दिवसाच्या दूध संकलनाच्या येणा-या आकडेवारीवर प्रतिलिटर 4 रुपये याप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.  त्यानुसार आतापर्यंत जमा झालेली 2 कोटी 93 लाख 85 हजार 277 रुपयांची रक्कम  धनादेशाद्वारे  मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून उत्स्फूर्तपणे आलेला 11 लाख 50 हजार 692 इतका निधी असे एकूण 3 कोटी 5 लाख 35 हजार 969 रुपये जमा झाले. हा सर्व निधी धनादेशाद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात आला.
        यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते, पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनिल डिग्गीकर, महानंदच्या अध्यक्ष श्रीमती वैशाली नागवडे तसेच सहकारी व खासगी दुध संघ व दूध प्रक्रिया प्रकल्प धारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 
Top