सांगोला (राजेंद्र यादव) -: आमसभेतील प्रश्नांची नोंद करुन त्यांची 2 महिन्यात काय कारवाई केली त्याचे रजिष्टर करुन नागरीकांना पहावयास मिळेल. राज्य शासनाकडील अडचणींचा पाठपुरावा केला जाईल. असे विचार आ. गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. 
        सांगोला नगरपालिकेच्या आमसभेमध्ये मार्गदर्शन करताना आ. देशमुख बोलत होते. याप्रसंगी माजी आ.शहाजीबापू पाटील, नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर, मुख्याधिकारी धैर्यशिल जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
         याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. गणपतराव देशमुख म्हणाले की, सर्वांनी विविध प्रश्नावर विचार केला पाहिजे. सर्वच भागात पाण्याचे समान वाटप करण्याचा प्रयत्न केला जाईल. सांगोला शहर सुधारित शहर विकास आराखड्यात नागरीकांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. सांगोला रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेस नगरविकास खात्याच्या 126 अ योजनेअंतर्गत उत्तर-दक्षिण असा समांतर रस्ता 1 वर्षात झाल्यानंतर वहातुकीवरील बोजा कमी होईल. वहातूक सुरळीत होईल त्यासाठी 2 कोटी 88 लाख रुपये खर्च आहे. शहाजीबापू पाटील म्हणाले की, नागरीकांच्या सूचना, तक्रारी महत्त्वाच्या आहेत. राज्यामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. सांगोला शहरात पाण्याची स्थिती चांगली आहे. नगरपालिकेने निधी उपलब्ध करुन प्रगती साधली आहे. शहराच्या शांतता, सुव्यवस्थेबरोबरच शहराचा कारभार गतिमान होईल.
    आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळामध्ये शहर विकास आराखड्यासाठी बराच काळ गेला असला तरी दलित सुधारणा, नगरोत्थान, नागरी दलिते तर 13 वा वित्तआयोग, अल्पसंख्यांक , रस्तानिधी, सुजल निर्मल, अग्नीशामक महाऊर्जा याबाबीमधून 8 कोटी 28 लाखांची कामे वर्षात केल्याचे सांगितले.
    माजी नगराध्यक्ष, नगरसेवक प्रा. पी. सी झपके यांनी विकास आराखड्याबद्दल फेरबदल बाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. पाणी पुरवठ्यासाठी शासनाने मीटर कनेक्शन अनिवार्य केले आहे असे सांगितले.
    या आमसभेमध्ये नागरीकांनी पाणीपुरवठा, आरोग्य, विकास आराखडा, गुंठेवारी, वापर परवाना, गटार, घरकुल, दलितवस्ती सुधारणा, पाणीपट्टी वाढ, रस्ते, पाण्याची पाईपनलाईन, स्मशानभूमी याविषयी आपल्या अडचणी, प्रश्न उपस्थित केले.
 
Top