उस्‍मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी व वडगाव (काटी) या ठिकाणी पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ पाहणी करुन तेथील ग्रामस्थाच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी फळबाग वाटप अनुदानाचा 11 लाख 62 हजाराचा धनादेश येथील ग्रामस्थांना पालकमंत्री ना. चव्हाण यांनी सुपूर्द केला.
    याप्रसंगी तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, जि.प. सदस्य अँड. धिरज पाटील, पंचायत समिती उपसभापती प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे, नायब तहसीलदार भरत सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी डी.आर. जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता दशरथ देवकर, सरपंच विष्णू पाटील, बिरुदेव लोकरे यांच्यासह पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी गंजेवाडी येथे विशेष दुरुस्ती अंतर्गत 4 लाख 25 हजार रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना राबविली आणि येथील ग्रामस्थाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून पाणी उपलब्ध करुन दिल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले. रोजगार हमी योजना,जनावरांसाठी छावण्या व पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.  घरकुल योजनेतून 62 घरकुलांपैकी 31 मंजूर केले असून 17 विहिरी पैकी 13 पूर्ण झाल्या आहेत.
      वडगाव (काटी) येथील पाणीटंचाईबाबत चर्चा करुन आवश्यक असणाऱ्या ठिकाणी टँकर चालू करण्याचे आदेश देण्यात आले. पेयजल योजनेतून उपलब्ध पाणी साठयावरील विंधन विहिरीचे पाणी ग्रामस्थांना लोकअर्पण करण्यात आले. ज्या भागात पाणीटंचाई आहे त्या ठिकाणी टँकर चालू करणे, अपूर्ण विहिरीचे कामे पूर्ण करणे, गावातील रस्ता दुरुस्त करणे करण्याबाबत संबंधित यंत्रणेला पालकमंत्री चव्हाण यांनी सूचना दिल्या.
 
Top