पंढरपूर -: राज्यातील जनतेला यंदा दुष्काळाची समस्या तीव्रतेने भेडसावत आहे. उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करतांना तसेच टंचाई निवारणाच्या उपाययोजना करताना अधिका-यांनी योग्य तो समन्वय ठेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केली.
    मोहोळ येथील बी. पी. एड. महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
    अपु-या पावसामुळे पाणी समस्या तीव्रतेने भेडसावत आहे. ही समस्या दुर करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडे आपण पुरवणी निधी मागणार असल्याचे सांगुन   श्री. ढोबळे पुढे म्हणाले की, वडापूर ध्ररणाऐवजी छोटे छोटे बंधारे बांधण्याबाबत पाटबंधारे विभागाच्या बांधकाम मंडळाने योग्य नियोजन करावे. हे नियोजन करीत असतांना अधिका-यांनी शासनाने नेमुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे.
    या आढावा बैठकीत जिल्ह्यातील विविध उपसा सिंचन योजना, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, वीज वितरण विभाग आदींचा त्यांनी आढावा घेतला.
    या बैठकीसाठी माजी आ. राजन पाटील, मनोहर डोंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुकुंद सरकटवार, वीज वितरण विभागाचे जितेंद्र सोनवणे, वन विभागाचे के. डी. ठाकरे, प्रांत अधिकारी महेश आव्हाड, तहसिलदार सदाशिव पडदुणे, वीज वितरणचे (ग्रामीण) अर्शदखान पठाण, पंढरपूर पाटबंधारे विभागाचे सचिन पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी - पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top