उस्मानाबाद -: जिल्ह्यात 89 गावात 5024 हेक्टर वनक्षेत्र असून  यात मुख्यत्वे हरीण, काळविट, लांडगे, कोल्हे, तरस, रानडुक्कर, मोर, करकोचे, गिधाड आदी प्रकारचे वन्य पशु पक्षी आढळतात. यावर्षी जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.   त्याचा फटका या वन्य जीवांना बसत होता. हे जाणून जिल्हा प्रशासनाने जिल्हा विकास निधीतून  वनामध्ये वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी  5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. यातून वन्य प्राण्यांसाठी पावसाचे पाणी पावसाळयानंतर बराच काळ  पिण्यासाठी मिळावे या करीता 23 पाणवठे तयार करण्यात आले असून लवकरच 73 पाणवठे (बशीच्या आकाराचे) तयार करण्यात येणार आहेत.
    उस्मानाबाद जिल्ह्यात हरिण, मोर आदि वन्य प्राण्यांचा जास्त प्रमाणात आढळ असलेल्या ठिकाणी सिमेंटचे ( 200 लि.क्षमतचे ) तयार हौद घेऊन एका ठिकाणी 5 नग ठेवून कृत्रिम पाणवठे 23 गावांच्या क्षेत्रात निर्माण करण्यात आले आहेत. या पाणवठयात बैलगाडी /टँकरद्वारे पाणी भरण्यात येऊन त्याचा लाभ आता या वन्यजीवांना होत आहे. जिल्हा विकास समितीने वन्यप्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करण्याकरीता प्राधान्याने दिलेल्या निधीतून 23 पाणवठे तयार केले असून तुळजापूर वनपरिक्षेत्रातील आळणी अंतर्गत दोन गावात, शिंगोली अंतर्गत एक गावात, उस्मानाबाद अंतर्गत दोन गावात या प्रमाणे एकूण 5 पाणवठे तयार केले आहेत.
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांनी याबाबत स्वत: लक्ष घालून जिल्हा विकास निधीतून निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे विभागीय वन अधिकारी जी.एन. गुंजकर यांनी सांगितले.
         भुम वनपरिक्षेत्रातील भुम नियतक्षेत्रात 1, ईट नियतक्षेत्रात 1, वाशी वनपरिमंडळातील वाशी नियतक्षेत्रात 5, कळंब वनपरिमंडळातील कळंब नियतक्षेत्रात 1 व परंडा वनपरिमंडळातील अनाळा नियतक्षेत्रात 2 या प्रमाणे 9 पाणवठे केले आहेत. उमरगा वनपरीक्षेत्रातील उमरगा परिमंडळ व नियतक्षेत्रात 5 पाणवठे, मुळज नियतक्षेत्रात 1 लोहारा वनपरिमंडळ व नियतक्षेत्रात 3 पाणवठे या प्रमाणे 9 पाणवठे तयार केले आहेत.
         याशिवाय अशाच  प्रकाराचे पाणवठे तुळजापूर वन परिक्षेत्रात 17, भुम 13, उमरगा वन परिक्षेत्रात 14 याप्रमाणे एकूण 44 गावांतील वनांमध्ये 73 पाणवठे असून या पाणवठयापैकी सुस्थितीतील पाणवठयात बैलगाडी / टँकरद्वारे पाणी आणून पाणवठा भरण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
   
 
Top