बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- येथील ग्रामीण रूग्‍णालयात अचानकपणे गोंधळ करीत महिला डॉक्‍टर बोपलकर यांच्‍या केबिनबाहेरील पेशंटची व्‍यवस्‍था करणा-या अनिल लंगोटे या कर्मचा-यास मारहाण केली. यावेळी समक्ष असलेल्‍या पोलीस कर्मचारी घाटे यांनाही मारहाण करुन त्‍या महिलेने व त्‍यांच्‍यासोबत आलेल्‍या चार ते सहाजणांनी पळ काढला.
    ग्रामीण रूग्‍णालया सोमवारचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा जास्‍त गर्दीचा असतो. याचदिवशी कॅम्‍पही होता. यावेळी महिला डॉक्‍टर शितल बोपलकर या दैनंदिन कामकाजाप्रमाणे रूग्‍णांची तपासणी करीत बसल्‍या होत्‍या. यावेळी त्‍यांच्‍या तपासणी खोलीबाहेर रूग्‍णांची पडताळणी करीत त्‍यांना शिस्‍तीत एकएक करुन सोडणा-या कर्मचारी अनिल लंगोटे यांच्‍या अंगावर एक महिला धाऊन आली व मोठमोठ्याने आरडाओरड करु लागली. मला आत जायचे आहे, असे म्‍हणत लंगोटे यांना बाहेर आढून मारहाण करीत असताना एका रूग्‍णाच्‍या सोबत आलेले पोलीस कर्मचारी घाटै यांनी सदरच्‍या प्रकारामुळे आपले कर्तव्‍य समजून सोडविण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी घाटे यांना त्‍या चार जणांनी अंगावर धावून येत जोराने ढकलून दिले. सदरच्‍या प्रकारानंतर घाटे हे पोलीस असल्‍याचे तसेच बोपलकर यांनी पोलिसांना फोन लावत असल्‍याचे लक्षात आल्‍यावर त्‍या महिलेने व तिच्‍यासोबत आलेल्‍या साथीदारांनी तेथून पळ काढला.
    सदरच्‍या घटनेनंतर लंगोटे यांनी लेखी निवेदन बार्शी पोलिसात दिले आहे. सदरच्‍या महिलेने यापूर्वीही एका कर्मचा-यास अशाचप्रकारे मारहाण केल्‍याचे त्‍या कर्मचा-याने सांगितले. परंतु त्‍यावेळी त्‍याने त्‍या महिलेविरूध्‍द तक्रार दिली नव्‍हती. समजदार व्‍यक्‍तींनी त्‍यावेळेस मध्‍यस्‍थी करुन तक्रार न देण्‍याचा सल्‍ला दिल्‍याने सदरच्‍या प्रकरणावर पडदा पडला होता. परंतु सदरची महिला वारंवार अशा प्रकारचे कृत्‍य करीत असल्‍याने कारवाई करण्‍याची गरज निर्माण झाली आहे. सदरची महिला उपळाई रोड येथे राहत असल्‍याचे तसेच तिचा रंग, उंची, तिचे वर्णन, कपड्याचे वर्णन यावरुन पोलिसांना त्‍या महिलेचा शोध घेणे सोपे आहे.
 
Top