सोलापूर :- जिल्ह्यातील पशुधन जगावे यासाठी जिल्ह्यात सुरु करण्यात येणा-या चारा छावण्यांना प्रशासनातर्फे तत्काळ मंजूरी देण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिली.
    उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगांव, बाणेगांव, अकोले काटी, गावडी दारफळ, कोंडाळी, भागाईवाडी, शेरेवाडी आदी गावांचा पालकमंत्र्यांनी दौरा केला. त्याप्रसंगी तेथील ग्रामस्थांना त्यांनी मार्गदर्शन केले.
      राज्य शासन दुष्काळ निवारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र हे प्रयत्न करत असताना दुष्काळ निवारणासाठी जनतेनेही प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन करुन पालकमंत्री पुढे म्हणाले की, उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व बंधा-यांच्या दुरुस्तीचे काम संबंधित यंत्रणेने ताबडतोब हाती घ्यावे, मग्रारोहयो योजनेची कामे मोठया प्रमाणावर सुरु करावीत त्याचबरोबर पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक गावांना तत्काळ टँकर सुरु करावेत. विहिरी अधिग्रहण कराव्यात, तसेच ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बसवाव्यात, आवश्यकता भासल्यास ग्रामपंचायतीने बोअर घ्यावेत अशा सूचनाही श्री. ढोबळे यांनी यावेळी केल्या.
     या गावभेट दौ-यांनंतर त्यांनी हिप्परगा तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पहाणी करुन समाधान व्यक्त केले. या गावभेट दौ-याप्रसंगी, गावातील पाणंद रस्त्यांची कामे सुरु करण्याबाबत, पाणीपुरवठा योग्य दाबाने व सुरळीत व्हावा तसेच पाझर तलावांची गळती बंद करण्यासाठी पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.  
     यावेळी त्यांच्या समवेत जि.प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी महादेव बेळ्ळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.जी. गीरगांवकर, जितेंद्र साठे, संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top