उमरगा -:  राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या उमरगा आगाराच्‍या एसटी बसमध्‍ये दहा किलो गांजा आढळल्‍याने एकच खळबळ उडाली. ही  घटना बुधवार रोजी दुपारी उमरगा बसस्‍थानकात घडली. याप्रकरणी पोलिसांन गांजा जप्‍त केला आहे.
    उमरगा आगाराची उस्‍मानाबाद-उमरगा (एमएच 20 बीएल 1016) ही बस उस्‍मानाबाद येथून दुपारी दीड वाजण्‍याच्‍या सुमारास उमरगा बसस्‍थानकात आली. त्‍यावेळी बसचे चालक पाटील व वाहक संदीप मुगळे यांना बसमध्‍ये एक बॅग आढळून आली. ही माहिती त्‍यांना तात्‍काळ आगारप्रमुख ए.एन. जोशी यांना दिली. ही बाब त्‍यांनी उमरगा पोलिसांना कळविली. त्‍यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.व्‍ही. जाधव, पोलीस उपनिरीक्षक हरिदास जाधव यांनी घटनास्‍थळीची पाहणी करत प्रभारी तहसिलदार दिनेश झांपले यांच्‍यासमवेत पंचनामा करुन बॅग ताब्‍यात घेतली. तपासणीनंतर त्‍या बॅगेत दहा किलो ओलसर गांजा असल्‍याचे निदर्शनास आले. गांजा पोलिसांनी ताब्‍यात घेतले असून अज्ञात व्‍यक्‍तीविरूद्ध उमरगा पोलिसात गुन्‍हा दोखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
 
Top