पंढरपूर -: यंदा राज्याला दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. या परिस्थितीत सर्वांनी एकत्रित येऊन याचा मुकाबला करणे आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यातील फळबागा जगविण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहाय्य करण्यात येईल, अशी ग्वाही कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
     मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचोळे येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून घेतलेल्या कोरडवाहू शाश्वत प्रकल्पांतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
     यावेळी आमदार भारत भालके, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. एस.एल. जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी रविंद्र पाटील, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंखे आदी उपस्थित होते.
     कृषी विभागाने मंगळवेढा तालुक्यात पाणलोटाची कामे मोठ्या प्रमाणावर घ्यावीत, त्याचबरोबर नाले, तलाव, बंधारे आदींचे खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण करण्यासाठी वाहनांना लागणारे डिझेल शासनातर्फे देण्यात येईल. जिल्ह्यातील फळबागा वाचविण्यासाठी शासनाच्यावतीने 61 कोटी रुपये देण्यात आल्याचेही विखे पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.
     तत्पुर्वी कृषी मंत्र्यांनी सुरेश लेंडवे यांच्या जळालेल्या सिताफळ बागेची तर ज्ञानदेव लेंडवे यांच्या डाळिंब बागेची पहाणी करुन शेतक-यांनी बागा जगविण्यासाठी मल्‍चिंग करुन घ्यावे, मल्चिंग करण्यासाठी कृषी अधिका-यांनी शेतक-यांना सहाय्य करावे अशी सूचना केली. त्याचबरोबर दामाजी सहकारी साखर कारखान्यामार्फत बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधा-यातील गाळ काढण्याच्या कामाची पहाणी केली.
    मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आ. भारत भालके यांनी यावेळी प्रतिपादन केले. याप्रसंगी मंत्री महोदयांच्या हस्ते पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे उदघाटन करण्यात आले.
     यावेळी मंगळवेढ्याचे तहसीलदार गोविंद सांगडे, गटविकास अधिकारी डी.यु.दराडे, पंचायत समिती (मंगळवेढा) सभापती संभाजी गावखरे, तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे, लेंडवे चिंचोळेचे सरपंच देविदास इंगोले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top