नळदुर्ग : दुष्‍काळी प्रश्‍नावर शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता आपलं घर येथे परिसंवाद आयोजित केले आहे.
         गेल्‍या तीन वर्षामध्‍ये मराठवाडयामध्‍ये कमी पाऊस झाल्‍याने यावर्षी भीषण दुष्‍काळी परिस्थितीमुळे जनतेच्‍या पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनतो आहे. त्‍याच पशुधन वाचविण्‍यासाठीही चारा नसल्‍याने शेतक-यांना मोठी जिवाची परवड करावी लागत आहे. दुष्‍काळामध्‍ये रोजगा-यांच्‍या हाताला काम मिळत नाही, हे भयावह चित्र एका बाजूला दिसत असताना शासन मात्र फक्‍त नियोजन आणि आढावा बैठका यातच मशगुल असून अंमलबजावणीच्‍या नावाने ठनठनाटच आहे. त्‍यामुळे एकीकडे निसर्गाच्‍या लहरीपणाचे आसमानी संकट तर दुसरीकडे चुकीचे धोरणात्‍मक निर्णय गाफिल शासन सुलतानी संकट. या आसमानी व सुलतानी संकटात सर्वसामान्‍य जनता मात्र भरडली जात आहे.
    त्‍यामुळे आपल्‍या जिल्‍ह्यामध्‍ये पाणी, चारा आणि रोजगार हे प्रश्‍न घेऊन शासनावरती दबाव आणणे आणि त्‍यातुन निवारणासाठी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. कारण आणखी मे, जून आणि जुलै या तीन महिन्‍यात हीच परिस्थिती असणार असून किंबहुणा त्‍याहुनही अधिक बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्‍यासाठी आपल्‍या जिल्‍ह्यातील सेवाभावी संस्‍था, संघटना व चळवळीतील कार्यकर्त्‍यांची बैठक ज्‍येष्‍ठ समाजवादी नेते साथी पन्‍नालाल सुराणा यांच्‍या नेतृत्‍वाखाली शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता आपलं घर नळदुर्ग येथे आयोजित केली आहे. तरी या बैठकीसाठी उपस्थित राहण्‍याचे आवाहन आपलं घरचे व्‍यवस्‍थापक शिवाजी पोतदार, रचनात्‍मक संघर्ष समितीचे संजय लाडके, युवा जनशक्‍ती संघटनेचे मुकेश सोनकांबळे यांनी केले आहे.
    सध्‍या जिल्‍ह्यात दुष्‍काळी निवारण्‍यासाठी प्रयत्‍न करणा-या संस्‍था संघटनाचा व व्‍यक्‍तींचा सन्‍मान या कार्यक्रमात केला जाणार आहे.
 
Top