कळंब -: पूर्वीपासून दुष्‍काळातल्‍या वेदनामध्‍ये साहित्‍य निर्माण करण्‍याची प्रेरणा असते. दुष्‍काळातील सामान्‍यांची अस्‍वस्‍थता हिच त्‍याला नवीन साहित्‍य निर्माण करण्‍यास उदयुक्‍त करते, असे प्रतिपादन जेष्‍ठ साहित्यिक तथा पहिल्‍या बालाघाट राज्‍यस्‍तरीय मराठी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष प्रा. भास्‍कर चंदनशिव यांनी कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर साहित्‍य नगरी येथे आयोजित संमेलनात अध्‍यक्षीय भाषणात केले.
    यावेळी या कार्यक्रमाला उदघाटक म्‍हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष तथा संतपीठाचार्य ह.भ.प. बोधले महाराज हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून जगविख्‍यात पखवाज वादक उध्‍दव बापू आपेगावकर, प्रसिध्‍द उदयोजक राजेंद्र मिरगणे, डॉ. अशोक मोहेकर, प्रा. संजय कांबळे, जेष्‍ठ पत्रकार अमर हबिंब, दशरथ यादव, कुलगुरु मधुकर गायकवाड, राजेसाहेब देशमुख, प्रा. महेंद्र चंदनशिव आदी मान्‍यवर यावेळी व्‍यासपीठावर उपस्थित होते.
    पुढे बोलताना प्रा. चंदनशिव म्‍हणाले की, दुष्‍काळानेच ख-या अर्थाने साहित्‍य निर्माण केले. याच साहित्‍याने समाजाला काहीतरी दिलं आहे. त्‍यामुळे खचलेल्‍या माणसांना आत्‍मविश्‍वास आणि स्‍वाभिमान मिळाला आहे. आज माणसांच्‍या संवेदना पाझरल्‍यामुळे माणूस एकमेकांपासून तुटत चालला आहे. वादाशिवाय साहित्‍य संमेलनही पार पडत नाहीत. त्‍यामुळे साहित्‍य कमकुवत बनत आहे.
    यावेळी स्‍वागताध्‍यक्ष शिवजाी लकडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. तर अखील भारतीय मराठी साहित्‍य परिषदेचे राष्‍ट्रीय कार्याध्‍यक्ष शरद गोरे, पखवाजवादक उध्‍दवबापू आपेगावकर, दशरथ यादव यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

प्रकाश महाराज यांनी आणली रंगत
    या साहित्‍य संमेलनाला अनेकांनी दांडी मारल्‍यामुळे रटाळ होणारे साहित्‍य संमेलनात ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांनी त्‍यांच्‍या खास यमक योजनेतून रंगत आणली. त्‍यामुळे उपस्थित रसिक मनापासून खळखळून हसले. '' आले नाहि फ.मु. तर आपले आपणच जमु'' या यमकाने संमेलनाला दांडी मारणा-या राजकारणी, साहित्‍यीक यांना कोपरखळ्या हाणल्‍या.
    या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी स्‍वागताध्‍यक्ष शिवाजी लकडे, सतिश मडके, अतुल गायकवाड, शिवाजी गिड्डे, शेखर गिरी, विशाल वाघमारे, ज्ञानदेव चिते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बबनराव माळी यांनी तर आभार सौ. प्राजक्‍ता पाटील यांनी मानले.
 
Top