सांगोला :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेविषयी असलेला न्यूनगंड दूर व्हावा, त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागावा यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरे महत्वाची आहेत असे प्रतिपादन पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी केले.   
       सांगोला पोलीस स्टेशन, रोटरी क्लब, सांगोला अर्बन बँक व नगरपरिषद यांच्यावतीने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात गावडे बोलत होते. व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष सुभाष लऊळकर, डॉ. प्रभाकर माळी, विष्णू लांडगे, गटविकास अधिकारी राहूल गावडे, सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. गावडे पुढे बोलताना म्हणाले, जीवनात उपयोगी पडणार्‍या टीप्स मार्गदर्शन शिबीरातून विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्याचा उपयोग त्यांनी वेळच्या वेळी केला तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही अशा स्पर्धा परीक्षांमधून आपले भवितव्य उज्वल करु शकतात. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्यास त्यांचे ध्येय निश्चितपणे ते पार करु शकतात. रोटरी क्लब, सांगोला अर्बन व नगरपालिका यांनी राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष सुभाष लऊळकर यांनी केले. या शिबीरात मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, गटविकास अधिकारी राहूल गावडे व पोलीस निरिक्षक दयानंद गावडे यांनी मार्गदर्शन केले. या शिबीराला रोटरीचे सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top