पंढरपूर :- यंदा दुष्काळाची तीव्रता जाणवत असून याचा मुकाबला करण्यासाठी राज्य व केंद्र शासन सामान्य जनतेच्या पाठीशी ठाम उभे आहे. मंगळवेढा तालुक्यातील 12 गावे म्हैसाळ योजनेत समाविष्ट झाली असून उर्वरित गावांनाही पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री  सुशिलकुमार शिंदे यांनी केले.
    मंगळवेढा तालुक्यातील हन्नुर, भोसे, नंदेश्वर व खडकी या गावच्या दुष्काळी भागाची पहाणी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केली. त्यावेळी उपस्थित जनतेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
    यंदा दुष्काळाचे सावट असून या परिस्थितीत शेतक-यांनी हतबल न होता संकटाचा एकत्रितपणे व विचारपूर्वक खंबीरपणे मुकाबला करावा असे आवाहन करीत मंगळवेढा तालुक्यातील सिमेंट बंधा-यासाठी खासदार निधीतून 50 लाख रुपये देणार असल्याची घोषणाही ना. शिंदे यांनी केली. त्याचबरोबर दुष्काळी कामात हयगय खपवुन घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
     विजापूर - मंगळवेढा - पंढरपूर हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पुर्ण व्हावा तसेच तालुक्यातील 35 गावांना पाणी मिळावे त्याचबरोबर जळून गेलेल्या फळबागांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी शासनस्तरावर प्रयत्न करावेत अशी मागणी आ. भारत भालके  यांनी केली.
    यावेळी ना. शिंदे यांनी हन्नुर येथील सिमेंट बंधारा, नंदेश्वर येथील विनायक नेने यांच्या जळालेल्या द्राक्ष बागेची तसेच सिमेंट बंधा-याच्या खोलीकरण व रुंदीकरणाची तर भोसे येथील चारा छावणीची त्याचबरोबर खडकी येथील साठवण तलावाची पहाणी केली. मंगळवेढा तालुक्यातील दौरा आटोपल्यानंतर त्यांनी पंढरपूर तालुक्यातील टाकळी, अनवली, कासेगांव आदी गावांनाही भेट देऊन तेथील अडचणी जाणून घेतल्या.
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे, बाळासाहेब शेळके, बबनराव अवताडे, कल्याणराव काळे, अविनाश शिंदे, बाबासाहेब काळे, प्रकाश पाटील, शिवाजीराव काळुखे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी - पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top