बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: हॉंगकॉंग रेडक्रॉस सोसायटीने बार्शी तालुक्‍यातील आपत्‍ती निवारण व्‍यवस्‍थापन अंतर्गत (डीआरआर) दत्‍तक घेतलेल्‍या कासारवाडी या गावात मागील दोन वर्षापासून इंडीयन रेडक्रॉस सोसायटी उपशाखा बार्शीच्‍या मदतीने केलेल्‍या विविध कामांचे मूल्‍यांकन आज सकाळी हॉंगकॉंग रेडक्रॉसच्‍या प्रतिनिधींनी गावात प्रत्‍यक्ष येऊन करत या कामाचे कौतुक करुन समाधान व्‍यक्‍त केले.
    यावेळी हॉंगकॉंग रेडक्रॉस सोसायटीच्‍या प्रतिनिधी एनकास चाऊस, ललीता गुरुंग व दिल्‍ली रेडक्रॉस सोसायटीच्‍या सीमा मोहंती, मुंबई रेडक्रॉसचे विनोद सईद, मनोज सकट, इंडीयन रेडक्रॉस सोसायटी उपशाखा बाशी्रचे सचिव डॉ. काका सामनगांवकर, संस्‍थापक सदस्‍य डॉ. द.ग. कश्‍यपी, सुभाष जवळेकर, प्रा. रामेश्‍वर लढ्ढा, विवेकानंद देवणे, मूकबधिर शाळेचे चेअरमन विनम संघवी, प्रकल्‍प संचालक अजित कुंकूलोळ, ए.बी. कुलकर्णी, प्रतापराव जगदाळे, कासारवाडीचे सरपंच रवींद्र यमगर, तंटामुक्‍त समितीचे अँड. प्रकाश गुंड आदीजण उपस्थित होते.
    मागील दोन वर्षापासून हॉंगकॉंग रेडक्रॉस सोसायटीने दत्‍तक घेतलेल्‍या कासारवाडीत अंतर्गत व बाह्य रस्‍ते, वक्षारोपण या उपक्रमाबरोबरच विविध प्रकारचे शिबीरे, विशेषतः आपतकालीन प्रशिक्षण शिबीर, आपतकालीन साधनसामुग्री, तसेच पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या प्रत्‍येकी दोन हजार लिटर पाण्‍याच्‍या तीन टाक्‍या बसविणे, गावात रेडक्रॉस सोसायटीच्‍या मदतीने 22 महिला बचतगट स्‍थापन करुन प्रत्‍येक बचत गटांना चार शेळ्या व दोन बचतगटांना विविध वस्‍तू भांडार सुरु करण्‍यासाठी भांडी देऊन मदत केली. या सर्व कामांचा आढावा घेत हॉंगकॉंग रेडक्रॉसच्‍या प्रतिनिधींनी समाधान व्‍यक्‍त करत भविष्‍यातही अशाप्रकारचे उपक्रम राबवले जातील असे सांगितले. उपस्थित मान्‍यवरांचा यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटी उपशाखा बार्शीच्‍यावतीने सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी श्रीमान रामभाई शहा रक्‍तपेढीचे प्रशांत बुडूख, सागर वामकर, कपील हिंगमिरे, धनाजी मंडलीक, सचिन गुंड, राजू काळे यांच्‍यासह ग्रामस्‍थ उपस्थित होते.
    हॉंगकॉंग रेडक्रॉस सोसायटीने महाराष्‍ट्रातील तीन तालुके दत्‍तक घेत तिथे नागरी सुविधा पुरविण्‍याबरोबरच आरोग्‍य, शिक्षण व बचत गटातील महिलांनी मदत केली आहे. राज्‍यातील सोलापूर जिल्‍ह्यातील बार्शी तालुक्‍यातील कासारवाडी व कांदलगांव ही दोन गावे, यवतमाळ जिल्‍ह्यातील वणी व मुंबई शहरातील एक गाव याप्रमाणे तीन तालुके दत्‍तक घेतले आहे.
---------------

 
Top