उस्मानाबाद :- पाणीपुरवठा व दुष्काळ निवारण कार्यात  शासन जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून विकास कामासाठी शासन निधीची कमरता कमी पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही  पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दिली.
    उस्मानाबाद तालुक्यातील मेडसिंगा सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात आयोजित पाणीपुरवठा टंचाई व दुष्काळ निवारणार्थ ग्रामस्थांशी चर्चा करताना श्री. चव्हाण बोलत होते.
    यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, विश्वास शिंदे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण सरडे, सिनेटचे सदस्य नितीन बागल, गटविकास अधिकारी प्रियदर्शीनी मोरे, तालुका कृषी अधिकारी एस. पी. जाधव, सिध्देश्वर जाधव, बाळासाहेब शिंदे, तहसिलदार जाधव, आदिं उपस्थित होते.
    पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, प्रत्येकास पाणी पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. उजणीचे पाणी उस्मानाबाद शहरास फिल्टर करुन मिळणार आहे. या पाणीपुरवठयाच्या कामावर  सुमारे 150 कोटी रु. खर्च करण्यात आला असल्याचे  नमूद केले.
    प्रत्येक गावास पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व आवश्यक तेथे छावण्या उभारण्यात येत आहे. बेरोजगार हाताना रोजगार मिळवून देण्यास शासन बांधिल आहे. टंचाईचा सामना सर्वांनी एकजूटीने करण्याची आवश्यकता आहे. कृषी विभागाने विहीरीची, शेततळीची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत नालाबंडींगची कामे घेवून नाला सरळीकरणाच्या कामास प्राधान्य दयावे. बेरोजगारांना रोजगार मिळवून दयावा. सध्या अनेक गावातील विहीरी आटल्याने पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे. विहीरीतील गाळ काढून विहीरी  खोल करावी व तेथे उपलब्ध होणारे पाणी  नागरीकाना पिण्यासाठी उपयोगात आणावेत. शेतकरी व स्वयंसेवी संस्थेनी जनावरांसाठी छावण्या सुरु केल्यास शासन त्यास मदत करेल, असेही श्री. चव्हाण म्हणाले.
         सरडे म्हणाले की, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्याचे 2 कोटी रुपये बँकेत जमा करण्यात आले असून लाभधारकांनी आपले खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याचे आवाहन केले. या योजनेत एकही लाभार्थी वंचित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
    सरपंच रघुराम आगळे यांनी गावातील अपुर्ण रस्ता पुर्ण करुन गावात 2 विंधन विहीर मजूर कराव्यात, गावात पाणलोटाची कामे मंजूर करण्याविषयी निवेदन मंत्रिमहोयांकडे सादर केले. याप्रसंगी ग्रामसेवक, शेतकरी, ग्रामस्थ,विविध सेवा सोसायटी सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
देवळाली गावास भेट
    तत्पुर्वी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी उस्मानाबाद तालुक्यातील  देवळाली गावास भेट दिली. तेथील गावक-याच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. सरपंच  देशमुख यांनी गावात टँकरने पाणी पुरवठा करावा व नवीन 2 विहीरी घेण्याची मागणी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे केली.
 
Top