बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी हे इंग्रजांच्‍या काळापासून शहराचा दर्जा प्राप्‍त असलेले तसेच अनेक सुविधांनी युक्‍त असलेल्‍या शहरांपैकी एक तसेच मराठवाड्याची सुरुवात व एकमेव श्री भगवंताची नगरी म्‍हणून प्रसिध्‍द आहे. शहरातील मुख्‍य बाजारपेठेत पूर्वीपासून अनेक अत्‍यावश्‍यक ठिकाणी सार्वजनिक मुता-या अस्तित्‍वात होत्‍या. याच्‍या नजीक अथवा पाठीमागच्‍या बाजूस अनेक धनिकांच्‍या वडिलोपार्जित स्‍थावर मालमत्‍ता, मोकळ्या अथवा चांगल्‍या बांधकामाच्‍या जागा होत्‍या. बार्शी नगरपरिषदेत जसजसे सत्‍तांतर होत गेले, तसतसे विचार प्रवाह बदलत गेले. सत्‍तेच्‍या व पैशाच्‍या लालचेतील काही नगरसेवकांनी सार्वजनिक मुता-या नेस्‍तनाबूत करुन काही धनिकांकडून अर्थपूर्ण वाटाघाटीतून स्‍वतःचे हित जोपासले. किरकोळ जागेसाठी नियमबाह्य गोष्‍टी नियमात अथवा कायद्यात रातोरात बसवून सदरच्‍या ठिकाणी असलेल्‍या मुता-यांपैकी जवळपास 80 टक्‍के मुता-यांची वाट लावली. स्‍त्री असो अथवा पुरुष त्‍यांना प्रत्‍येकाला अत्‍यावश्‍यक असलेल्‍या तसेच वैद्यकीय शास्‍त्रानुसार गरजेच्‍या नैसर्गिक विधीसाठी आवश्‍यकता असतानाही लोकहिताऐवजी स्‍वः हित जोपासून खिसे‍ गरम केले. अनेक नागरीक तर डोळयाने दिसत असून धृतराष्‍ट्र झाले. आपण ज्‍यांना आपला नेता समजतो, त्‍याच्‍या नावाखाली गैरप्रकार होत असूनही त्‍या नेत्‍याची दिशाभूल करत चमच्‍यांनी लँडमाफियांशी हातमिळवणी केली व यांना नगरपरिषदेच्‍या कर्मचा-यांची कायदेशीर पळवाटा सांगितल्‍या. सदरच्‍या एकापाठोपाठ एक प्रकारानंतर लँडमाफियांचा आत्‍मविश्‍वास बळावला आणि त्‍यांनी मुता-यांच्‍या जवळ असलेल्‍या जागांचे सौदे सुरु केले. ज्‍या जागेला कवडीमोल भाव होता, त्‍या जागांना लाखांचे मोल आल्‍यामुळे हीच चांगली वेळ असल्‍याचा समज करुन मुळ जागा मालकांनी मिळेल त्‍या रकमेला आपल्‍या जमिनी विकण्‍यास सुरुवात केली. मुतारी असली तरी जागा विकत घेऊन लँडमाफियांचा गोरख धंदा सुरु झाला आणि सत्‍तेच्‍या मस्‍तीत बेधुंदर झालेल्‍या नेत्‍यांना लोकांच्‍या हिताचे भान राहिले नाही. त्‍यांच्‍यावर अंकुश ठेवण्‍याची जबाबदारी असलेल्‍या विरोधी पक्षाने तर कधीही आपले अस्तित्‍व सिध्‍दच केले नाही. ना दाद ना फिर्याद अशी नागरिकांची गत झाल्‍याने त्‍यांनी आपला हक्‍क मात्र सोडला नाही. मुता-या रातोरात पाडल्‍या तरीही नागरिकांनी त्‍याच जागेवर उघडयावर नैसर्गिक विधी सुरु ठेवला. या मुता-यांची आवश्‍यकता असलेले अनेकजण रूग्‍ण आहेत, अनेक जण वयोवृध्‍द आहेत, अनेक जवळपासचे व्‍यापारी आहेत. अनेकजण बाजारपेठेत खरेदी विक्रीच्‍या निमित्‍ताने येणारे प्रवाशी आहेत.
    सत्‍ता भोगणा-या स्‍त्रीयांना देखिल आपल्‍या भगिनींचे प्रश्‍न काय याबाबत आवाज उठवायला अथवा त्‍यावर ठोस उपाययोजनेसाठी भांडायला वेळ नाही. माझ्यात इतरांपेक्षा काहीतरी कमीच असल्‍याची भावना त्‍यांच्‍यामध्‍ये सतत दिसून येत असल्‍याने त्‍यांचाही गैरफायदा घेतला जातो. केवळ आम्‍ही सांगितलेल्‍याच प्रश्‍नावर बोट वर करायचे, एवढेच त्‍यांचे काम असल्‍याचे बोलले जात आहे. नगरपरिषदेने वैयक्तिक हित जोपासण्‍यापेक्षा सार्वजनिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्‍याचा विचार करणे गरजेचे आहे. मोठाड गप्‍पा मारुन ठेकेदार जगवणा-या पालिकेच्‍या सत्‍ताधारी, विरोधक तसेच कर्मचा-यांनी लोकांच्‍या अगदी किरकोळ गरजेसाठी काय केले? याचे आत्‍मपरीक्षण करावे, याबाबत नागरिकांत चर्चा होत आहे.
 
Top