बार्शी (मल्लिकार्जून धारुकर) -: आपल्‍याकडे केवळ शासनाच्‍या नावाने ओरड करण्‍याचे प्रमाण जास्‍त असून सर्व गोष्‍टी शासनाचे करण्‍यापेक्षा शासनाच्‍या हातात हात घालून संकटावर मात करण्‍याचा प्रयत्‍न करु, असे मत राजेंद्र मिरगणे यांनी व्‍यक्‍त केले.
          उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील कळंब येथे आर.एस.एम. उद्योग समूह व संत मिरा पब्लिक स्‍कूल, भैरवनाथ अध्‍यापक विद्यालयाच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात मिरगणे हे बोलत होते. कळंब येथील ढोकी रोडवरील भैरवनाथ अध्‍यापक विद्यालयाच्‍या प्रांगणात सोमवारी या प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्‍यात आली. यावेळी भैरवनाथ निसर्ग मंडळाचे सचिव डॉ. प्रतापसिंह पाटील, कळंबचे प्रभारी नगराध्‍यक्ष पांडुरंग तात्‍या कुंभार, राष्‍ट्रवादीचे माजी तालुकाध्‍यक्ष दिलीप पाटील, भैरवनाथचे प्रशासकीय अधिकारी रामेश्‍वर सुरवसे, प्रा. अशोक सावळे, राजाभाऊ काकडे, गौतम मिगणे, सिध्‍देवर मुंबरे, नवनाथ मिरगणे, अँड. प्रकाश गुंड, अविनाश पोकळे, गिरीष घळके, कमलाकर कोकीळ, संजय घुले, रुपाळी काळे आदी मान्‍यवर उपस्थित होते.
         पुढे बोलताना राजेंद्र मिरगणे म्‍हणाले, विना वशिल्‍याने गुणवत्‍तेवर आणि समाजासाठी चांगले काम करण्‍यास उपलब्‍ध असलेल्‍या पोलिस भरतीसाठी युवकांनी मोठ्या संख्‍येने सहभाग नोंदविला असून यातील तळमळीने तसेच जिद्द व चिकाटीने प्रयत्‍न करणारांना नक्‍कीच संधी उपलब्‍ध असून केवळ भरतीची अपेक्षा न करता त्‍यापुढे जात मोठ्या पदापर्यंत पोहोचण्‍याचा प्रयत्‍न या युवकांनी करावा, या युवकांवर प्रशिक्षण कालावधीमध्‍ये चांगल्‍या दर्जाचे संस्‍कार घडवून त्‍यांच्‍याकडून उच्‍च दर्जाच्‍या शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी म्‍हणून नाव कमवतील हा आमचा उद्देश आहे. केवळ पोलिस भरतीपुते मर्यादित स्‍वरुप न ठेवता यापुढे आपण एम.पी.एस्‍सी., यु.पी.एस्‍सी सारख्‍या स्‍पर्धा परीक्षेसाठी युवकांना सर्वतोपरी सहकार्य करण्‍याचा प्रयत्‍न करणार असून दुष्‍काळाच्‍या परिस्थितीत लग्‍नाच्‍या कारणावरुन आणखी कोणी कर्जबारी होऊ नये, यासाठी दि. 23 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना ते म्‍हणाले की, सध्‍याच्‍या दुष्‍काळी प‍रिस्थितीत शेतक-यांच्‍या मुलांसाठी मुंबई, पुण्‍यासारख्‍या ठिकाण जाऊन प्रत्‍येकी तीस ते पसत्‍तीस हजार रुपये खर्चून प्रशिक्षण केंद्रात सहभागी होऊन नोकरीसाठी प्रयत्‍न करणे हे शक्‍य नसल्‍याने तसेच त्‍यांना झेपत नसताना आणखीन कर्जबाजारी होण्‍याचे चिन्‍ह दिसत असल्‍याने बार्शीतील आर.एस.एम. उद्योग समूहातर्फे अशा विद्यार्थ्‍यांकरीता मोफत प्रशिक्षण देण्‍याचे ठरले आहे. सदरचे प्रशिक्षण देताना आम्‍ही स्‍वतःच्‍या नावासाठी अथवा मोठी वाहवा मिळविण्‍यासाठी या गोष्‍टी करत नसून माझा जन्‍मच उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील देवळाली या छोट्याशा गावात झाला असून उस्‍मानाबाद जिल्‍हा हा माझी जन्‍मभूमी व कर्मभूमी आहे. या मातीचे ऋण फेडण्‍यासाठी अथवा त्‍यातून थोडीशी उतराई होण्‍यासाठीच हा छोटासा प्रयत्‍न करत असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले.
           यावेळी प्रा. अशोक सावळे, दिलीप पाटील, सिध्‍देश्‍वर मुंबरे, राजाभाऊ काकडे, रुपाळी काळे, पांडुरंग कुंभार, प्रतापसिंह पाटील यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्‍या प्रारंभी प्रशिक्षण केंद्राच्‍या मैदानाचे पूजन करण्‍यात आले. भैरवनाथ अध्‍यापक विद्यालयाच्‍या विद्यार्थीनीनी स्‍वागत गीत गायले. विविध क्षेत्रातील यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा यावेळी गौरव करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक माचणे यांनी तर सुत्रसंचलन व आभार प्रा. सुशिल शेळके यांनी मानले.
 
Top