उस्‍मानाबाद -: औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, उस्‍मानाबाद येथे दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर वस्‍तीगृहातील प्रशिक्षणार्थ्‍यांना दोन महिन्‍याचा जेवणाचा शिधा व पिण्‍याच्‍या पाण्‍याची साठवणुक करण्‍यासाठी चार टाक्‍यांची मदत खा.डॉ. पद्मसिंह पाटील यांच्‍याकडून करण्‍यात आली.
      यावर्षी उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात प्रचंड दुष्‍काळ पडला आहे व त्‍याच्‍या झळा सर्वत्र पसरत आहेत. त्‍याची दाहकता औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत जाणवत आहे. त्‍यामुळे संस्‍थेतील सर्व व्‍यवसायातील प्रशिक्षणार्थ्‍यांच्‍या शिष्‍ट मंडळाने शिल्‍पनिदेशक कोपा  झरकर के.पी. यांच्‍या नेतृत्‍वाखाली आ. राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेतली होती व मागील आठवड्यात आ.पाटील यांनी संस्‍थेस भेट देऊन प्रशिक्षणार्थ्‍यांच्‍या अडचणी स्‍वतः समक्ष प्रशिक्ष्‍ाणार्थ्‍यांना विचारुन जाणून घेतल्‍या होत्‍या.
       खा.डॉ. पद्मसिंह पाटील यांनी संस्‍थेस पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या चार टाक्‍या व वस्‍तीगृहातील प्रशिक्षणार्थ्‍यांना जेवणासाठी दोन महिन्‍याचा शिधा वाटप केला. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक करताना शिल्‍पनिदेशक झरकर के.पी. म्‍हणाले की, दुष्‍काळामुळे प्रशिक्षणार्थ्‍यांना प्रशिक्षण घेण्‍यात अडचणी निर्माण होत आहेत. त्‍यांना बाहेरगावाहून येण्‍यासाठी मोफत पासची सोय करावी, दरमहा खुलागट 40 रु. व जात प्रवर्ग 60 रुपये एवढे तुटपुंजे विद्यावेतन मिळत आहे. ते वाढवून दोन हजार रुपये करावे, तसेच यावर्षी दुष्‍काळी परिस्थितीमुळे त्‍यांची भरलेले परीक्षा शुल्‍क व बी.सी.सी. शुल्‍क परत मिळावे, अशा प्रशिक्षणार्थ्‍यांच्‍या अडचणी मांडल्‍या.
        यावेळी खा.डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपल्‍या भाषणात वरील सर्व अडचणीवर मार्ग काढण्‍यासाठी सकारात्‍मक प्रयत्‍न करण्‍याचे आश्‍वासन दिले. तसेच पुढे बोलताना त्‍यांनी सांगितले की, कौडगांव येथे होऊ घातलेल्‍या एम.आय.डी.सी. मुळे उस्‍मानाबाद तालुक्‍यातील सर्व गरीब प्रशिक्षणार्थ्‍यांना रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करुन देऊ, कोणताही प्रशिक्षणार्थी रोजगारापासून वंचित राहू देणार नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेमुळेच उद्योगाची भरभराट होत आहे. महिला प्रशिक्षणार्थ्‍यांसाठी नियोजनबद्द पध्‍दतीने कॅम्‍पस इंटरव्हिवचे नियोजन करुन स्‍थानिक पातळीवर अँपँटीशीप व रोजगार उपलब्‍ध करुन देऊ, मुख्‍यत्‍वे करुन विद्यावेतन अत्‍यंत कमी आहे. ते वाढविण्‍यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्‍याचे व त्‍यात भरघोस वाढ करण्‍याचे आश्‍वासन दिले.
       या कार्यक्रमासाठी तेरणा शे.स. कारखान्‍याचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, तेरणा अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शेखर जगदे, आय.टी.आय.चे प्राचार्य उड्डाण शिवे, गट निदेशक कुलकर्णी, शिल्‍पनिदेशक झरकर, गायकवाड, हंगरगेकर शेरकर, कारवार, सरवदे, वाघमारे, कोळीकर, बिराजदार, गाडेकर, नाईक, राऊत कर्मचारी वर्ग उपस्थित होते. जोंधळे यांनी आभार मानले. उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील खेड्यापाड्यातून 1500 प्रशिक्षणार्थी व लाभार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.
2009 साली तत्‍वत: मंजूर झालेल्‍या महिला आय.टी.आय.ला खा.डॉ.पाटील यांनी निधी मंजूर करुन द्यावा : झरकर
सन 2009 साली महाराष्‍ट्र शासनाने अध्‍यादेश काढून महिला आय.टी.आय. ला तत्‍वतः मंजूरी दिली होती. मात्र त्‍यानंतर कोणतीही अर्थसंकल्‍पीय तरतुद यासाठी करण्‍यात आली नाही. औरंगाबाद व लातुरच्‍या धर्तीवर उस्‍मानाबाद येथे मान्‍यता असलेल्‍या आय.टी.आय. ला भरीव आर्थिक तरतुद करण्‍याची मागणी झरकर यांनी यावेळी केली. त्‍यावर खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी सकारात्‍मक प्रतिसाद देत महिला आय.टी.आय. साठी त्‍वरीत पाठपुरावा करुन निधींची तरतुद मंजूर करुन देण्‍याचे आश्‍वासन दिले.            
 
Top