बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : महाराष्‍ट्रातील सर्वात चांगल्‍या असलेल्‍या उजनी धरणातून मोठ्या शहरांसोबत बार्शी शहराचादेखील पाणीपुरवठा अवलंबून आहे. सध्‍याची दुष्‍काळाची परिस्थिती असताना पाण्‍याचे महत्‍त्‍व फार वाढले असतानाही बार्शी-कुर्डुवाडी रोडवर शेंदरीच्‍या पुढे सुमारे दीड किलोमीटरवर एका शेतक-याने मात्र स्‍वतःची ऊसाची शेती या पिण्‍याच्‍या पाण्‍यावर जगवी आहे. सदरच्‍या जागेतून जाणा-या पाईपलाईनला छिद्र तयार झाले असून यातून चोवीस तास गळती सुरु आहे. मागील अनेक महिन्‍यापासून सदरचा प्रकार सुरु असतानाही अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहेत.
    काही वर्षापूर्वी बार्शी शहराला नगरपरिषदेमार्फत एका दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा केला जात होता. शहराला चांदणी जलाशयातून तसेच बार्शी शहरातील शक्‍यतो कधीही न आटणा-या व मोठ्याप्रमाणात पाणीपुरवठा करणा-या विहीरींना अधिग्रहीत करुन आणि इंग्रजांनी राबविलेल्‍या पाथरीच्‍या तलावातील पाण्‍याच्‍या योजनेच्‍या कसल्‍याही प्रकारच्‍या विद्युत मोटारी शिवाय, कसल्‍याही प्रकारच्‍या देखभाल खर्चाशिवाय केवळ सायफन पध्‍दतीच्‍या तंत्राने पाणीपुरवठा केला जात होता. आ. दिलीप सोपल यांच्‍या विशेष प्रयत्‍नाने यापेक्षा चांगली असलेली उजनीची योजना यशस्‍वीपणे राबविली. तांत्रिक अडचणीमुळे काही ठिकाणी पाईपलाईन फुटत असल्‍याने याला विशेष पॅकेजमधून चांगली पाईपलाईन बसविली व लोकांच्‍या पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न सोडविला. पाथरीच्‍या योजनेतील पाणीपुरवठा करणा-या पाईपलाईनला रेल्‍वेच्‍या मीटरगेजमुळै अडथळा निर्माण झाला व मोफत बिनबोभाट मिळणारा पाणीपुरवठा बंद झाला. सदरच्‍या बाबत ठोस उपाययोजना करण्‍यास नगरपरिषदेला अपयश आलेले असतानाच दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर मागील अनेक महिन्‍यांपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत केला. परंतु कसेतरी लोकांचा विना खर्चाचे पाणी उपलब्‍ध केले व ज्‍या प्रकारच्‍या कृत्‍याला फौजेदारी स्‍वरुपाचे गुन्‍हे दाखल करणे गरजेचे आहे. त्‍याबाबत मात्र अधिकारी आणि राज्‍यकर्ते मुग गिळून बसल्‍याचे दिसून येते. याबाबत त्‍या शेतक-याला विचारले असता, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी याच उजनीच्‍या पाण्‍यावर स्‍वतःचा इंदेश्‍वर शुगर्स हा खाजगी साखर कारखाना चालविला आहे. संजय शिदे यांचा विठ्ठल शुगर्स हा कारखाना देखील याच पाण्‍यावर सुरु होता. मग आमच्‍या सारख्‍या गरीब शेतक-यांनी थोडी चोरी केली तर काय होते?
    सद्यस्थितीत उन्‍हा तीव्रता वाढत असताना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न असताना मुक्‍या प्राण्‍यांना मात्र अनेक ठिकाणी कोणी पाणी उपलब्‍ध न केल्‍याने कुत्र्यांसारखे प्राणी उघड्या गटारीत वाकून पाणी पिताना दिसत आहेत. बार्शी- कुर्डवाडी रस्‍त्‍यावर खांडवी गावाजवळ तसेच पानगाव येथे पाईपलाईनच्‍या कॉकमधून थोडी गळती सुरु असल्‍याने त्‍याचा वापर ग्रामस्‍थांना चांगला होत आहे. सदरच्‍या ठिकाणापासून वस्‍ती दोन ते पाच किलोमीटर अंतराव असून पाण्‍याची कमतरता असल्‍याने लहान मुली, महिला व पुरष रांगा लावनू पाणी गोळा करुन आपली तात्‍पुरती गरज भागवित आहे. शहरातील अनेक हातपंपावर मोठ्या रांगा असल्‍याचे चित्र दिसत आहे. ज्‍यांच्‍याकडे पाण्‍याचे बोअर आहेत. त्‍यापैकी अनेक जण इतरांना मोफत पाणीपुरवठा करत असल्‍याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी लोकांनी उत्‍स्‍फुर्तपणे पाणपोई सुरु केली आहे.
    मुक्‍या जनावरांना पाणी, नागरिकांना पिण्‍यासाठी पाणी, पक्षांना पाणी इत्‍यादी आवश्‍यक गरजा असून या पाण्‍याचा शेतीसाठी गैरवापर होत असल्‍याची बाब गंभीर असून जबाबदार अधिका-यांनी याला गांभिर्याने घेण्‍याची गरज निर्माण झाली आहे.
 
Top