सांगोला : निरा उजवा कालव्यास उन्हाळी हंगामाकरिता दरवर्षी दि. १५ एप्रिलपूर्वी पाणी सोडण्यात येते. मात्र, यावर्षी कालवा फोडाफोडीच्या प्रकरणानंतर पाणी उशीरा सुटले. त्यामुळे शेतातील उभी पिके व फळबागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. ऐन दुष्काळात चुकीच्या नियोजनामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून याबाबत शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
       परंपरेने दुष्काळी असलेल्या सांगोला तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी निरा उजवा कालवा व्यतिरिक्त कोणतेही पर्यायी साधन नाही. निरा उजवा कालव्याच्या पाण्यावर शेतीची मदार अवलंबून आहे. सलग तीन वर्षे कमी पाऊसमान झाल्यामुळे ओढे, नाले, तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पातळ्यांवरही गंभिर परिणाम झाला आहे. शिवाय विहिरीच्या पाण्याच्या पातळ्या अत्यंत खोलवर गेल्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. निरा उजवा कालव्यातून मिळणार्‍या पाण्यातून शेतकर्‍यांना बर्‍यापैकी दिलासा मिळतो. चालू वर्षी पाटबंधारे विभागाकडे शेतकर्‍यांनी नमुना ५ चे फॉर्म भरून १५ हजार एकरासाठी पाणी मागणी अर्ज केले आहेत. या मिळणार्‍या पाण्यातून शेतातील उभ्या पिकांना (मका, भूईमूग, कडवळ, ऊस, फळबागा) पाणी देण्यासाठी नियोजन केले आहे.
        दरम्यान, निरा उजवा कालव्यास दरवर्षी उन्हाळी हंगामासाठी दि. १५ एप्रिलपूर्वी पाणी सोडण्यात येते. परंतु, चालू वर्षी निरा उजवा कालवा माळशिरस तालुक्यात दरवर्षीप्रमाणे दोन ठिकाणी फुटल्यामुळे (फोडाफोडीचे प्रकरण) सांगोला व पंढरपूर तालुक्यातील उन्हाळी हंगामातील पाण्याचे नियोजन कोलमडले. याबाबत शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
        दरम्यान, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातील उपलब्ध पाण्यानुसार निरा उजवा कालवा मैल ९३ खाली उन्हाळी हंगामाकरिता सांगोला व पंढरपूर तालुक्यातील शेतीच्या साडेसात हजार एकराच्या सिंचनाकरिता १ टी.एम.सी. पाणी मंजूर करण्यात आले आहे. या पाण्यातून सिंचनाचे ३५ दिवसाचे नियोजन केले असून या कालावधीत कालव्यांतर्गत उपफाट्यातून पाणी दिले जाणार आहे. शेतकर्‍यांनी या पाण्यातून शेतातील उभी पिके व पिण्यासाठी वापर करताना पाणी हे नैसर्गिक संपत्ती समजून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाटंबधारे विभाग व तहसिलदार सांगोला यांच्याकडून करण्यात आले आहे.
 
Top