बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील स्‍व.सौ.शोभाताई महिला बहुउद्देशीय विकास संस्‍थेच्‍यावतीने खासदार वंदना चव्‍हाण, महिला बालकल्‍याण समितीच्‍या सभापती जयमाला गायकवाड यांच्‍या हस्‍ते स्‍त्री-भूषण पुरस्‍कार प्रदान व अर्धांगिनी या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्‍यात आले.
    स्‍व. यशवंतराव चव्‍हाण सांस्‍कतिक कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. यात सौ. साधना सोले, सोलापूर येथील साहित्यिक सौ. कविता मुरुमकर, वैराग येथील सौ. सुवर्णा भूमकर यांना माहेरची साडी, स्‍मृतिचिन्‍ह, शाल व श्रीफळ देऊन स्‍त्री-भूषण पुरस्‍काराने गौरविण्‍यात आले. यावेळी प्रा.डॉ. भारती रेवडकर यांनी कै.सौ. शोभाताई सोपल यांच्‍यावर लिहिलेल्‍या अर्धांगिनी या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्‍यात आले.
    यावेळी पुणे येथील महापौर व खासदार वंदना चव्‍हाण, जि.प.महिला व बालकल्‍याण समितीच्‍या सभापती सौ. जयमाला गायकवाड, महाराष्‍ट्र राज्‍य मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन तथा आमदार दिलीप सोपल, अर्धांगिणी या चरित्रग्रंथाच्‍या लेखिका डॉ. भारती रेवडकर, सौ. अलकाताई सोपल, सौ. वर्षाताई ठोंबरे, मंदाताई काळे, बार्शी नगरपरिषदेच्‍या नगरसेविका, जि.प. व पं.स. सदस्‍या यांच्‍यासह इतर मान्‍यवर उपस्थित होते.
    पुरस्‍काराला उत्‍तर देताना सौ. सुवणा्र भूमकर म्‍हणाल्‍या, स्‍त्रीमध्‍ये त्रीमुर्ती आदिशक्‍ती सामावलेली असते. समता, संस्‍कार व शिक्षण याद्वारे सहिष्‍णुता तसेच जेव्‍हापासून जाण येते तेंव्‍हपासून स्‍त्री ही आत्‍मसमर्पण भावनेतून वर्तन करते. स्‍वतःचे अस्तित्‍व, आरोग्‍य व स्‍वप्‍नांच्‍या समिधा टाकणा-या महासतीने गांधारीचा वसा अग्रक्रमाणे चढत्‍या क्रमाने परत करायचा असतो. राजकीय क्षेत्रात असलेल्‍या सास-यांकडून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. घरातील एकत्र कुटुंब पध्‍दतीमुळे दुस-यांच्‍या प्रती आदर व प्रेम यांच्‍यात वाढ झाली. समाजसेवेत त्‍याचा फायदा झाला व त्‍यामुळे अनेक छोटे मोठे सामाजिक कार्य करता आले. 1971 साली लावलेल्‍या  बालवाडी या छोटयाशा रोपटयाला चांगले नावारुपाला आणत सामाजिक कार्याच्‍या निधी गोळा करताना माझ्याबरोबर अनेक थोरामाठयांच्‍या सुनांनी नाटाकांतील भूमिका साकारल्‍या. शासनाच्‍या विविध योजनांना योग्‍य लाभार्थ्‍यांपर्यंत पोहोचविण्‍याचे कार्य करताना दुवा म्‍हणून काम करता आले. आयुष्‍याच्‍या उत्‍तरार्धात परमेश्‍वराजवळ हेच मागेन, हे परमेश्‍वरा पुन्‍हा मानव जन्‍म देणार असेल तर स्‍वप्‍न पाहण्‍यासाठी डोळे, इतरांना साथ देण्‍यासाठी हात आणि माझ्या माणसांची साथ दे, असे त्‍यांनी शेवटी सांगितले.
    कविता मुरुमकर बोलताना म्‍हणाल्‍या, हा मला आजपर्यंतच्‍या मिळालेल्‍या पुरस्‍कारापेक्षा श्रेष्‍ठ आहे. कारण हा स्‍त्री-भूषण पुरस्‍कार आहे. माझ्या अस्मितेचा गौरव आहे. जिजाऊ विना शिवबा नाही. मुक्‍तईविना ज्ञानेश्‍वर नाही, भुवनेश्‍वरी विना विवेकानंद नाही. ज्‍या स्‍त्रीमुळे संस्‍कृती निर्माण झाली, त्‍या स्‍त्रीच्‍या अस्तित्‍वाला आज धोका निर्माण झाला आहे. सावित्रीच्‍या लेकींची ही संस्‍था असून त्‍यांच्‍याकडून मिळालेल्‍या पुरस्‍काराने मला आनंद होत आहे.
    अर्धांगिनी या चरित्रग्रंथाच्‍या लेखिका प्रा.रेवडकर म्‍हणाल्‍या, हा आनंद आणि दुःखा सोहळा असून ज्‍यांच्‍या चरित्रावर आपण पुस्‍तक लिहीले त्‍या स्‍व.शोभाताई सोपल आज नसल्‍याने दुःख तर माहेरी तसेच सासरी समाजकारण करणा-या स्‍व.सौ. शोभाताई सोपल यांचे सुसंवादी व्‍यक्‍तीमत्‍व कसे होते, हे पुढील पिढीतील स्‍त्रीयांना समजावून देण्‍यासाठी त्‍यांचे पुस्‍तक प्रकाशन होते, त्‍यांचा आनंद आहे. त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व, सामान्‍यांपयर्रूंत पोहोचण्‍याचे कसब, अनेक छोट्या मोठ्या अनुभवातनू त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व रेखाटताना आ. सोपल यांनी परवानगी घेतली. त्‍यांच्‍या या पुस्‍तकातून मिळालेल्‍या मुल्‍यातून गरजूंना मदत कार्य करणार असून तीच त्‍यांना श्रद्धांजली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
    आ. दिलीप सोपल बोलताना म्‍हणाले की, वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणा-या स्‍त्रीयांना सन 2000 सालापासून संस्‍थेने केलेला गौरव इतर महिलांना प्रेरणादायी आहे. पूर्वीचा रमाबाई रानडे इत्‍यादींचा काळ वेगळा होता. परंतु आजच्‍या स्त्रिया ह्या उच्‍च शिक्षण घेत स्त्रियांनी शिक्षणांची सुरुवात पुण्‍यातूनच सुरु केली आहे. महिलांना राजकीय क्षेत्रातून वाव देण्‍यासाठी केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांनी पहिल्‍यांदा महिला धोरण जाहीर केले. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेत वाव देण्‍यासाठी जागा निर्माण केल्‍या. बार्शी हा त्‍यापूर्वीपासूनच महिलांच्‍याबाबत अग्रेसर आहे. कारण सन 1962 ते 1972 या दहा वर्षांच्‍या कालावधीत प्रभाताईंच्‍या स्‍वरुपात व पुढे सन 1972 ते 1976 पर्यंत शितोळे ताईंच्‍या स्‍वरुपात प्रतिनिधीत्‍व केल्‍याने त्‍यात विशेष वाटत नाही. शहर व तालुक्‍यातील भगीनींना राजकीय वातावरण चांगले आहे व जिल्‍ह्यातही पूर्व सरींनी घरातील स्त्रियांना समाजसेवेचे धडे देत मार्गदर्शन केले. तिच वहिवाट घेत पुण्‍यासारख्‍या ठिकाणी वंदना चव्‍हाण यांनी उच्‍च शिक्षण धेत महापौर पदासारख्‍या उच्‍च पदावर स्‍वतःचा ठसा उमटवत स्‍कर्तुत्‍ववार तसेच राज्‍यसभेत खासदार म्‍हणून काम करीत आहे.
    खासदार वंदना चव्‍हाण बोलताना म्‍हणाल्‍या की, 33% महिलांना संधी मिळेल हे कधी ध्‍यानीमनीपण नव्‍हते, परंतू महिला या निश्चितच चांगले काम करतात याचा अनुभव आला. काही लोकांच्‍या मतानुसार त्‍या केवळ रबर स्‍टँप होतील, त्‍याऐवजी चांगल्‍या पध्‍दतीचे काम करुन तारेवरची कसरत करत न्‍याय दिला. अनेक अनुभव घेतल्‍यानंतर आपल्‍यालाही वाटते की, कशाला लष्‍कराच्‍या भाकरी करायच्‍या? ताणतणावात उभारी देण्‍याचे काम यावेळी घरच्‍या व्‍यक्‍ती करतात. धक्‍काधक्‍कीच्‍या जीवनात शोभाताईंनी जे सामाजिक कार्य करत हितचिंतकांचे जाळे निर्माण केले, ते प्रेरणादायी आहे.
    कार्यक्रमाच्‍या प्रारंभी स्‍व.सौ. शोभाताई सोपल, सावित्रीबाईंच्‍या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाच्‍या सुरुवात करण्‍यात. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सोमेश्‍वर धाणेगावर यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ.भारती रेवडकर, सचिव सुरेखा गुळमे, उपाध्‍यक्षा करुणा हिंगमिरे, नगरसेविका मंगलताई शेळवणे, शैलजा पाटील, सुमन बारसकर, शोभा जाधव, जयश्री हिरफोड, श्रीमती वनिता वाघ, श्रीमती महादेवी गोटे, सुरेखा बचुटे, सुमन कांबळे यांनी विशेष घेतले.

 
Top