उस्मानाबाद :- जिल्ह्यातील पाणीटंचाईमुळे पाणीपुरवठ्यासाठी नागरी  व ग्रामीण भागात विहिरी व विंधन विहिरी अधीग्रहीत करण्यात आल्या आहेत. याद्वारे उपलब्ध होणाऱ्या पाणीवाटप संदर्भात दैनंदिन अहवाल पाठवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
   येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. नागरगोजे यांनी हे निर्देश दिले.
      डॉ. नागरगोजे यांनी यावेळी तालुकानिहाय पाणीपुरवठयाची सद्यस्थिती जाणून घेतली. आठही नगरपालिका क्षेत्रातील मुख्याधिकाऱ्यांकडून त्यांनी पाणीपुरवठ्यासाठी केल्या जात  असलेल्या उपाययोजनांचा  आढावा घेतला. संबंधित यंत्रणांनी त्या-त्या ठिकाणची परिस्थिती पाहून योग्य ते नियोजन करावे. सध्या उपलब्ध पाणीसाठ्यातील पाणीपातळी घटत चालली आहे. अशावेळी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे, असे त्यांनी  सांगितले.
      उमरगा शहरासाठी महत्वपूर्ण असणा-या माकणी योजनेच्या कामाची माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एम. एस. भालेराव आणि उमरगा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगळे यांच्याकडून घेतली. सध्या उमरगा शहरास 10 टँकरव्दारे तसेच कोळसूरमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्याव्दारे पाणीपुरवठा केली जात असल्याचे डॉ. टेंगळे यांनी सांगितले.
        तुळजापूर शहरात सध्या बोरी धरणातून तुळजापूरला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इतर पर्यायांचा विचार केला जात असल्याची माहिती  तुळजापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी  संतोष जिरगे यांनी दिली.
        उस्मानाबाद शहरासाठी सध्या आळणी आणि चोराखळी तलावातून पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय तेरणा  धरणात घेण्यात आलेल्या स्ट्रेंचेसमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्यामधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती उस्मानाबाद नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर यांनी यावेळी दिली. परंडा शहरासाठी सध्या पुरेशे पाणी उपलब्ध होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पाणीपुरवठ्यासाठी जेथून पाणी उपलब्ध होते, त्याठिकाणी जास्त वेळ वीजपुरवठा उपलब्ध करुन दयावा, अशी माहिती यावेळी करण्यात आली.
          या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. डी. बोणे, उपजिल्हाधिकारी (रोहयो), सतोष  राऊत, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. कोटेचा, पशुसंवर्धन उपायुक्त भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आर.आर.चंदेल, जिल्हा  नागरी विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. कुरवलकर, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे  वरिष्ठ भूवैज्ञानिक रेड्डी, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तांगडे आदी बैठकीस उपस्थित होते. 
 
Top