मुंबई -:  देशामध्ये मानाचा समजला जाणा-या पंचायत सक्षमीकरण  संचयी प्रदानीकरणात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला असून महाराष्ट्रास प्रथम क्रमांकाचा 2.50 कोटी रुपयांचा पुरस्कार 24 एप्रिल, 2013 रोजी राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पंतप्रधान  डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
     सोमवार रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस.एस. संधू आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
     भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने पंचायतराज संस्थांचे सबलीकरण करण्यासाठी तसेच त्यांचे उत्तरदायित्व वाढविण्यासाठी "पंचायतराज उत्तरदायित्व आणि प्रोत्साहन योजना" सुरु केली आहे. यात विविध राज्यांनी 73 व्या घटना दुरुस्तीनंतर पंचायतराज संस्थांना प्रदान केलेल्या अधिकारांचे मूल्यांकन करून प्रत्येक राज्याचा निर्देशांक ठरविण्यात येतो आणि त्यावर राज्यांना पुरस्कार देऊन गौरविले जाते असे सांगून श्री. पाटील म्हणाले, या योजनेअंतर्गत राज्याला अधिकार प्रदान क्षेत्रात सलग दोन वर्षे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळत होता. यासह यावर्षी आपल्या राज्याने केरळ राज्याला मागे टाकत पंचायत सक्षमीकरण संचयी प्रदानीकरणात देखील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे.
     याशिवाय राज्यातील इतर 17 पंचायतराज संस्थांना 2012-13 या वर्षासाठी 1 कोटी 64 लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले असून त्याचे वितरणही राष्ट्रीय पंचायतराज दिनाच्या दिवशी नवी दिल्ली येथे होणार आहे.
     पुरस्कार प्राप्त पंचायतराज संस्थांमध्ये रत्नागिरी जिल्हापरिषदेला 40 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे तर अनुसूचित क्षेत्रातील पंचायत समितीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समिती तसेच ठाणे जिल्ह्यातील डहाणू पंचायत समितीला प्रत्येकी 20 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ग्रामपंचायत आंबेपूर, जि. रायगड, ग्रामपंचायत जालगांव, जि. रत्नागिरी, ग्रामपंचायत ओढा-जि. नाशिक, ग्रामपंचायत होळ- जि. धुळे, ग्रामपंचायत मान्याची वाडी- जि. सातारा, ग्रामपंचायत माण- जि. पुणे, ग्रामपंचायत शेळगांव गौरी- जि. नांदेड, ग्रामपंचायत झरी- जि. नांदेड, ग्रामपंचायत नशिरपूर- जि. अमरावती, ग्रामपंचायत यावली शहीद- जि. अमरावती, ग्रामपंचायत सावरगांव- जि. चंद्रपूर, ग्रामपंचायत शिवनी-मोगरा- जि. भंडारा या ग्रामपंचायतींना तसेच अनुसूचित क्षेत्रातील नाशिक जिल्ह्यातील दरी ग्रामपंचायत आणि ठाणे जिल्ह्यातील पोमण ग्रामपंचायत यांना प्रत्येकी 6 लाख रुपयांच्या पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
     पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या ठिकेकर ग्रामपंचायतीची राष्ट्रीय गौरव ग्राम सभेअंतर्गत निवड झाली असून या ग्रामपंचायतीला देखील यावेळी 10 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. पाटील यांनी यावेळी दिली.
 
Top