उस्मानाबाद :- जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवस्थानाच्या विकासासाठी राज्य शासनस्तरावर योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
     येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवीच्या मंदिरात दैनिक पुण्यनगरीच्यावतीने 5 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविण्यात आली असून त्यामार्फत भाविकांना पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज या मोफत पाणी वितरणाचा शुभारंभ झाला. त्यावेळी  चव्हाण बोलत होते.
    ना. चव्हाण म्हणाले की,तिर्थक्षेत्र आणि देवस्थान विकासासाठी जिल्हा परिषदेच्या  माध्यमातून तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पारंपारीक व पुरातन वारसा असलेली मंदिरे जपली जावीत यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. येरमाळा येथेही मंदिर विकासासाठीच्या सर्व योजना मार्गी  लावल्या जातील. देवस्थान ट्स्ट आणि स्थानिक पदाधिका-यांनी आपल्या मागण्या  योग्य त्या स्तरावर मांडाव्यात. राज्य शासनाच्या स्तरावरील मागण्यांबाबत आपण निश्चितपणे पाठपुरावा करुन त्या मार्गी लावू,असे त्यांनी नमूद केले.
    यात्रा काळात पिण्याच्या पाण्यासाठी टाकीची व्यवस्था केल्याबददल चव्हाण यांनी  धनंजय रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर,कळंब पंचायत समितीचे सभापती शिवाजी कापसे, अनिल पवार, मधुकर तावडे, नारायण समुद्रे, अप्पासाहेब पाटील, लक्ष्मण सरडे, ब्रिजलाल मोदानी, नितीन बागल, विकास बारकुल, दत्तात्रय बारकुल, अजित पिंगळे, अप्पासाहेब शेळके, बिभीषण खामकर, रणजित बारकुल, तहसीलदार राठोड तसेच येडेश्वरी देवस्थान ट्स्टचे पदाधिकारी आदिंची यावेळी  उपस्थिती होती.
 
Top