मंत्रालय म्हटले की आपल्या नजरेसमोर उभी राहते ती मुंबईत असलेली मंत्रालयाची भव्य वास्तू. या वास्तूच्या निर्मितीस आज जवळपास 58 वर्षे पूर्ण झाली आहेत.
       गतवर्षी लागलेल्या भीषण आगीमुळे या वास्तूच्या डागडुजीचे व काहीसे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. दि. 24 एप्रिल 1955 साली उद्घाटन झालेल्या या वास्तूचे म्हणजे मंत्रालयाच्या इमारतीचे आणखी दोन वर्षांनी हिरक महोत्सवी वर्ष आहे.  नूतनीकरणानंतर निश्चितच ही वास्तू एक नवी उमेद घेऊन जनतेच्या विश्वासाचे प्रतिक म्हणून अभिमानाने उभी राहील यात शंका नाही.
         मंत्रालय केवळ इमारत, निर्जीव वास्तू नाही तर लोकशाहीचे मंदिर आहे.  महाराष्ट्राच्या दृष्टीने ज्या ज्या हितवर्धक घटना झाल्या त्याचा साक्षीदार असलेली ही इमारत आहे.  राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनेक ठिकाणी इमारती आहेत.  परंतु त्या सर्वात अग्रस्थानी असलेली व सर्वार्थाने जनमान्य झालेली इमारत म्हणजे आपले मंत्रालय होय. 

मुंबई राज्याचे सचिवालय
    “मुंबई राज्याचे सचिवालय” म्हणून बांधण्यात आलेल्या या इमारतीचे भूमिपूजन 16 एप्रिल 1952 रोजी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांच्या हस्ते करण्यात आले.  महत्त्वाचे म्हणजे तद्नंतर अवघ्या तीनच वर्षात बांधकाम पूर्ण होऊन या वास्तूचे उद्घाटन तत्कालीन राज्यपाल हरेकृष्ण महताब यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या उपस्थितीत 24 एप्रिल 1955 रोजी करण्यात आले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री मालोजीराजे नाईक निंबाळकर होते.
    इमारतीची पायाभरणी सुप्रसिध्द मेकेन्जी लि.कंपनीने केली. तर इमारतीचे बांधकाम सर्वश्री शाह कन्स्ट्रक्शन कं. लि. यांनी केले.  त्यावेळी राज्यशिल्पाधिकारी म्हणून महादेव जाधव कार्यरत होते.  इतर अधिकाऱ्यांमध्ये इमारतीची विद्युत व्यवस्था सर्वश्री सरवैया अँण्ड कं. यांच्याकडे होती तर उदयसिंह महिडा व विलियम्स मॉस्करेनहस मुख्य अभियंता, शंकर करंदीककर, अधीक्षक अभियंता, सुरेंद्र नाडकर्णी, मुख्य विद्युत अभियंता, दुर्गाराव बोरकर कार्यकारी अभियंता (प्रेसिडेन्सी), दुडप्पा नाईक कार्यकारी अभियंता (विद्युत)आणि उप अभियंता म्हणून ईश्वरलाल मोदी, आशालाल शाह व तुकाराम माळी कार्यरत होते.
     मंत्रालय इमारतीचा सुवर्ण महोत्सव 2005 साली साजरा झाला.  त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिलेल्या प्रतिक्रिया –

माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख -: मंत्रालय म्हणजे केवळ इमारत किंवा निर्जीव वास्तू नसून हे लोकशाहीचे मंदिर आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने आजवर जे निर्णय घेण्यात आले त्यांची साक्षीदार असलेली  ही इमारत  आहे. राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये सर्वात अग्रस्थानी असलेली अशी ही वास्तू आहे. आपण लोकशाही शासन प्रणाली स्वीकारली आहे आणि जनतेच्या लोकशाहीवरील विश्वासाचे प्रतिक म्हणून मंत्रालयास ओळखले जाते. या इमारतीतून मिळालेला आदेश हा जनतेला निश्चितच विश्वासाचा वाटतो. मंत्रालयाची ही इमारत म्हणजे आदर्श वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. समुद्रकिनारी असलेली ही इमारत  अत्यंत दूरदृष्टीने आणि विचारपूर्वक बांधलेली आहे.

गृहमंत्री आर.आर. पाटील -: मुंबई इलाखा अस्तित्वात असताना सचिवालयाची आणि आताच्या मंत्रालयाची देखणी आणि मजबूत वास्तू अस्तित्वात आली. मंत्रालयाची ही इमारत निर्जिव वास्तू नाही; तर, चैतन्याचा अखंडपणे खळाळणारा प्रेरक असा स्त्रोत  आहे. राज्यातील गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला, बालके, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच शासकीय कर्मचारी यांना दिलासा देणारे शेकडो निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश याच इमारतीमधून देण्यात आले. सर्वसामान्य जनतेचा सर्वाधिक राबता असलेली ही इमारत आदर्श वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. दरवर्षी महत्वाच्या दिवशी ही इमारत रात्रीच्या वेळी विद्युत प्रकाशाने उजळून निघते; त्यावेळी तमाम मुंबईकरांचे मंत्रालयाची इमारत हे एक मोठे आकर्षण असते. इथं काम करणा-या प्रत्येक कर्मचाऱ्याला अभिमान वाटतो. तर इतरांना त्यांचे कौतुक वाटते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ -: महाराष्ट्राची जनतेच्या विश्वासाची अशी ही वास्तु आहे. 24 एप्रिल, 1955 रोजी जुने सचिवालय सोडून या नव्या वास्तुत राज्यकारभाराची सर्वोच्च धुरा वाहण्याचे काम सुरु झाले. आता त्या घटनेला पन्नास वर्ष होत आहेत. खऱ्या अर्थाने हे मंत्रालय सुवर्ण महोत्सवी झाले आहे. राज्यातील जनतेच्या हितार्थ झालेल्या विविध घडामोडींची मूक साक्षीदार असलेली ही वास्तू आत केवळ एक इमारत राहिली नसून ऐतिहासिक मुल्य असलेला ऐवज झाली आहे.

उत्तम वास्तूशास्त्र
    महाराष्ट्राच्या मंत्रालयाची इमारत म्हणजे उत्तम वास्तुशास्त्राचा नमुना आहे. इतर राज्यातील मंत्रालयांच्या तुलनेत आपली मंत्रालयाची इमारत निश्चितच सरस आहे.  मंत्रालयाची ही देखणी वास्तू म्हणजे मुख्य इमारत जेव्हा बांधण्यात आली तेव्हा  जवळपास 41 हजार 111 चौरस मीटर बांधकामास 65 लाख 46 हजार 936 लाख रुपये खर्च आला होता. तद्नंतर जवळपास पाच वर्षांनी 1961 साली मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम करण्यात आले.  त्या 33 हजार चौरस मीटर बांधकामास सुमारे 1.25 कोटी रुपये खर्च आला.  इमारतीच्या चारही बाजूंनी भरपूर खेळती हवा व सूर्यप्रकाश यामुळे अत्यंत मोकळी हवा इथे आहे.

1352 खिडक्या 650 दारें
या मंत्रालय इमारतीची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. सहा मजले असलेल्या या इमारतीत 754 खांब असून, त्यांची लांबी सुमारे अडीच मैल भरेल एवढी आहे. तर इमारतीसाठी सुमारे 1305 टन पोलाद वापरण्यात आले. इमारत बांधकामास 5 हजार टन सिमेंट वापरण्यात आले एवढ्या सिमेंटचा वापर करुन सुमारे 12 फूट रुंद व 4 इंच जाड  असा 26 मैल लांबीचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता होऊ शकला असता. महत्त्वाचे म्हणजे या इमारतीत एकूण 1352 पोलादी खिडक्या व 650 दरवाजे  आहेत. खिडक्यांचे क्षेत्रफळ सुमारे 30 हजार चौरस फूट आहेत तर त्यावेळी  विजेचे दिवे व पंखे अनुक्रमे 7000 व 1600 असे होते. तसेच टेलिफोनच्या एकंदर 57 डायरेक्ट लाइन्स आणि एक्स्चेंजमार्फत 200 टेलिफोन्सची सोय केली होती. इमारत बांधण्यासाठी 18 लाखांहून अधिक विटा वापरण्यात आल्या असून, त्या रांगेत लावल्या तर त्यांची लांबी 260 मैल झाली असती. 500 टन उत्कृष्ट सागाचे लाकूड व अबूहून आणलेला संगमरवरी दगडाचा यात वापर करण्यात आला. अशी ही भव्यदिव्य इमारत बांधण्यात आली.
       आगीच्या नंतर नुतनीकरण करण्याचे काम युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट मार्फत सद्या युध्द पातळीवर सुरु असून अल्प काळातच हे काम पूर्ण होईल आणि आपला तिरंगा अभिमानाने विविध घडामोडींची साक्ष देत या इमारतीवर नेहमीसारखा फडकत राहील.
 
 - राजू पाटोदकर                                                          patodkar@yahoo.co.in
 
Top