बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी शहराला पाणीपुरवठा करणा-या उजनी योजनेच्‍या करमाळा तालुक्‍यातील कंधर येथील सुरु असलेल्‍या टंचाई आराखड्यातील कामांची आमदार दिलीप सोपल यांनी पाहणी केली. या टंचाई आराखड्यातील कामांमुळे बार्शी शहराला जुलै अखेरपर्यंत अखंड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
    बार्शी शहराला बार्शी-कुर्डुवाडी संयुक्‍त पाणीपुरवठा अर्थात उजनी योजनेंतर्गत कंधर (ता. करमाळा) येथून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. 488 या पातळीला बार्शीचे पंपगृह आहे. बार्शी शहराला उजनी जलाशयातून नियमितपणे 1 कोटी 20 लाख लिटर पाणी उचलले जाते. सदर ठिकाणहून अखंडित पाणीपुरवठा होण्‍यासाठी टंचाई आराखड्याचे नियोजन करण्‍यात आले होते. त्‍याप्रमाणे सध्‍या कामाला सुरुवात झाली आहे.
    पंपगृहानजीक जलाशयाच्‍या दिशेने 500 मीटर लांब व 13 मीटर खोलीची गाळवाट सोडून तिरकी चारी घेण्‍यात येत आहे. सदरच्‍या कामासाठी दोन पोकलेन मशिन कार्यरत आहे. चारीतील गाळ काढणे, पाण्‍याच्‍या दिशेने वाट तयार करणे, आदी कामांचा यात अंतर्भाव आहे. यानंतरच्‍या टप्‍प्‍यात धरणपातळी 481 मीटरपर्यंत कमी होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा व्‍हावा, याकरीता दिड किलोमीटर अंतरापर्यंत जलाशयाच्‍या दिशेने पाईपलाईन, 8 पंपींग मशीनरीचे नियोजन करण्‍यात आले आहे. या देखील कामांना लवकरच सुरुवात करण्‍यात येत आहे.
    बुधवार रोजी आ. दिलीप सोपल, नगराध्‍यक्ष कादर तांबोळी, गटनेते योगेश अक्‍कलकोटे, देविदास शेटे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता डी.डी. तोंडे, कार्यकारी अभियंता बी.एस. बिराजदार, जलदाय व्‍यवस्‍था अभियंता ए.के. होनखांबे यांच्‍या समवेत या कामांची पाहणी करण्‍यात आली.
    सध्‍याच्‍या टंचाई आराखड्याच्‍या अंमलबजावणीमुळै जुलै अखेरपर्यंत बार्शी शहराला पिण्‍याच्‍या पाण्‍याचे अखंड वितरण केले जाणार आहे.
 
Top