बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- उजनी पाणीपुरवठा योजनेसाठी अत्‍याधुनिक पंपींग मशिनरी व सोलापूर जिल्‍ह्यातील पहिल्‍या इनडोअर सबस्‍टेशनचे उदघाटन आमदार दिलीप सोपल यांच्‍या हस्‍ते व नगराध्‍यक्ष कादर तांबोळी, गटनेते नागेश अक्‍कलकोटे, पाणीपुरवठा सभापती देविदास शेटे यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. 3 कोटी 56 लक्ष रुपयांचे हे काम 2026 ची लोकसंख्‍या गृहीत धरुन करण्‍यात आलेले आहे.
    करमाळा तालुक्‍यातील कंधर येथे हा उदघाटन समारंभ पार पडला. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता डी.डी. तोंडे, कार्यकारी अभियंता बी.एस. बिराजदार, जलदाय व्‍यवस्‍था अभियंता ए.के. होनखांबे आदीजण उपस्थित होते 300 अश्वशक्‍तीचे पंपसेटस काढून त्‍याजागी 450 अश्‍वशक्‍तीचे व्‍ही.टी.पंपसेटस बसवणे, कामापोटी 1 पंपसेट बसविण्‍यात आला आहे. ट्रान्‍सफार्मर 1000 के.व्‍ही.ए. क्षमतेचे 2, पैकी 1 कायमस्‍वरुपी आणीबाणी व्‍यवस्‍था म्‍हणून पर्यायी तसेच 100 के.व्‍ही.ए. चे 2 ट्रान्‍सफार्मर पैकी 1 पर्यायी बसविण्‍यात आले आहे. सोलापूर जिल्‍ह्यातील पाणीपुरवठा योजनेचे हे पहिले इनडोअर सबस्‍टेशन असून यात सर्व ब्रेकर इनडोअर करण्‍यात आले आहे. त्‍यासाठी 2 कंट्रोल रूमची उभारणी करण्‍यात आली आहे.
    तसेच कुर्डुवाडी येथे 60 अश्‍वशक्‍तीचे 3 पंप होते. त्‍याजागी 100 अश्‍वशक्‍तीचे 3 पंप बसविण्‍यात आले आहेत. 250 के.व्‍ही.ए. चे नवीन ट्रान्‍सफार्मर व सबस्‍टेशन तसेच सर्व पॅनल व स्‍टाट्रर नवीन बसवियात आले आहेत. विद्युत व्‍यवस्‍थेतील बिघाडामुळे होणा-या विस्‍कळीत पाणीपुरवठ्यावर कायमस्‍वरुपी मार्ग काढण्‍याच्‍या दृष्‍टीने 2026 ची लोकसंख्‍या गृहीत धरुन त्‍या क्षमतेची ही अत्‍याधुनिक व्‍यवस्‍था उभारण्‍यात आली आहे.
    राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सदरच्‍या कामासाठी 100 टक्‍के शासकीय अनुदानातून 3 कोटी 56 लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन दिल्‍यामुळे सदरचे काम करणे शक्‍य झाले आहे तसेच या अत्‍याधुनिक यंत्रणेमुळे बार्शीकरांना विद्युत पुरवठ्यातील बिघाडामुळे होणा-या पाणी टंचाईवर तोडगा निघाला आहे, असे आ. दिलीप सोपल यांनी म्‍हटले.
 
Top