बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: अत्‍यंत दयनीय अवस्‍था झालेल्‍या रस्‍त्‍याच्‍या बाबत सर्व राजकारण्‍यांनी व अधिका-यांनी पाठ फिरविल्‍याने मांडेगाव व देवळालीच्‍या ग्रामस्‍थांच्‍या मागणीनुसार राजेंद्र मिरगणे यांनी सर्व यंत्रणा व कच्‍चा माल दिला, केवळ येथील ग्रामस्‍थांनी श्रमदान करायचे आहे व आपल्‍या भागातील रस्‍ता चांगला करायचा आहे.
    बार्शी तालुक्‍याचे शेवटचे टोक असलेल्‍या मांडेगाव तसेच उस्‍मानाबाद जिल्‍ह्याच्‍या हद्दीतील भूम-परंडा तालुक्‍याचे टोकाचे गाव असलेल्‍या देवळाली या दोन्‍ही गावांच्‍या रस्‍त्‍याचा प्रश्‍न गंभीर बनल्‍याने या गावातून जाणारा मार्ग परिवहनची बसदेखील मागील एक दोन वर्षापासून ख्‍राब रस्‍त्‍याच्‍या कारणाने बंद करण्‍यात आली आहे. येथील गावक-यांनी दोन्‍ही तालुक्‍याचे आमदार दिलीप सोपल व राहुल मोटे यांच्‍यासह उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, जिल्‍हापरिषद सदस्‍य, पं.स. सदस्‍य, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्‍याशी अनेक वेळा प्रत्‍यक्ष भेटून रस्‍त्‍याच्‍या आवश्‍यकतेबाबत मनधरणी केली. परंतु प्रत्‍येकांनी वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ केल्‍याने शेवटी गावक-यांनी मांडेगांव ग्रामपंचायत बिनविरोध केलेल्‍या नवोदित राजकारणी तसेच समाजकारणी राजेंद्र मिरगणे यांच्‍याशी सविस्‍तर चर्चा केली.
    मिरगणे यांनी सदरच्‍या रस्‍त्‍याच्‍या कामासाठी लागणारी यंत्रणा सामग्री व कच्‍च्‍या मालासाठी आपल्‍याकडून सर्वतोपरी मदत देण्‍याचे कबूल केले व यासाठी आसपासच्‍या रहिवाशी ग्रामस्‍थांनी केवळ श्रमदान केल्‍यास या रस्‍त्‍याचे काम पूर्ण करता येईल, असा विचार मांडला. सदरच्‍या विचारास संपूर्ण सहमती दर्शवित गावक-यांनी तात्‍काळ काम हाती घेण्‍याची विनंती केली. रस्‍त्‍याच्‍व्‍या कामाची प्रत्‍यक्ष सुरुवात करताना राजेंद्र मिरगणे, प्रा. अशोक सावळे, दत्‍तात्रय जाधव, शिवाजी काकडे, पंडित मिरगणे यांच्‍यासह दोन्‍ही गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य व ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
    राजेंद्र मिरगणे यांनी केवळ सामाजिक कार्यासाठी प्राध्‍यान्‍य देत वैयक्‍तीक हित जोपासणा-यांना थोडे बाजूला ठेवत सुरु केलेले समाजकारण ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. मिरगणे यांनी सामाजिक जाणिवेतून आजपर्यंत केलेल्‍या कामामुळे नागरिकांच्‍या अपेक्षा वाढल्‍या असून त्‍यांनी समाजकारणातून राजकारणात सक्रीय व्‍हावे व चांगले नेतृत्‍व करुन आजपर्यंतची कसर भरुन काढावी, अशी अपेक्षा नागरीक करत आहेत.
    मोठ्या शहरातील सुप्रसिध्‍द अभियंता असलेल्‍या राजेंद्र मिरगणे यांचा जन्‍म मांडेगाव येथे झाला असून त्‍यांचे वडिल देवळाली येथे शिक्षक होते. त्‍यामुळे त्‍यांचे बालपणीचे शिक्षणदेखील देवळाली या गावातच झाले. आपल्‍या गावासाठी विशेष काम करताना मिरगणे यांना वेगळा आनंद होत असल्‍याचे यानिमित्‍तान दिसून आले आहेत.
 
Top