उस्‍मानाबाद :- महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीस मदत म्हणून गुजरात येथील मेहसाणा जिल्हा सहकारी दूध संघाने 22 हजार पाचशे तर इफ्को (इंडियन फार्मर्स  फर्टिलायझर्स कोऑपरेटीव्ह) या खत कंपनीने 18 हजार मेट्रीक टन पशुखाद्याचा मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मेहसाणा जिल्हा दूध संघाच्या वतीने उस्मानाबादसह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यांसाठी तर इफ्कोच्या वतीने अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांसाठी पशुखाद्य पुरविले जाणार आहे. पशुखाद्याचा पुरवठा चारा छावण्यातील पशुपालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सहकारी दूध महासंघ  (महानंद) ही संस्था राज्य समन्वयक म्हणून काम करणार आहे तर जिल्ह्यात बाणगंगा सहकारी साखर कारखाना यांना जिल्हास्तरावर समन्वयक म्हणून नेमण्यात आले आहे.
      सध्या चारा छावणीतील जनावरांना प्रतिदिन प्रती जनावर 1 किलो याप्रमाणात आठवडयातील 3 दिवसांसाठी 3 किलो पशुखाद्य राज्य शासन पुरवित आहे. त्याच धरतीवर आठवडयातील उर्वरित चार दिवसांसाठी प्रती जनावर 4 किलो जादा पशुखाद्ययाचा पुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत जिल्ह्यातील चारा छावण्या व जनावरांची संख्या याची संख्या लक्षात घेऊन पशुखाद्य वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे.
 
Top