सोलापूर :-  राज्यातील यावर्षी दुष्काळी परिस्थितीत पाण्याची कमतरता जाणवत आहे. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे. टँकरच्या पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन पाण्याच्या टाक्या देवून शासनाच्या कार्याला हातभार लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचे, प्रतिपादन राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केले.
    सोलापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पाण्याच्या टाक्या वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर अलकाताई राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आ. दिलीप माने, उप सभापती राजशेखर शिवदारे, माजी मंत्री आनंदराव देवकाते, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना विखे पाटील म्हणाले की, 1972 च्या दुष्काळात पाणी होते. धान्य नव्हते आता धान्य आहे पण पाणी नाही. अशा परिस्थितीत जनतेला मदत करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्व बाबी शासनाने कराव्यात ही मानसिकता बदलून विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी एकत्र येवून गावांसाठी काम करण्याचा प्रयत्न करावा.
    सोलापूर जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. यापुढे ऊसाची शेती पूर्णपणे ठिबकवर केली पाहिजे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतक-यांचा कसा फायदा होईल याचा विचार करावा. शेतीमालाच्या भावासाठीच बाजार समितीची निर्मिती झाली आहे. शेतक-यांची अडवणूक होवू नये याची काळजी घ्यावी. असे सांगून सोलापूर बाजार समितीचे शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या लवकरच पूर्ण करु अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली.
    याप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम म्हणाले की, अत्यंत भीषण दुष्काळाला आपण सामोरे जात आहोत. मोठ्या प्रमाणावर टँकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. टँकरद्वारे देण्यात येत असलेल्या पाण्याचा चांगला वापर होण्यासाठी पणन व सहकारी क्षेत्रातील संस्थांना पाण्याच्या टाक्या देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सोलापूर बाजार समितीने टाक्या दिल्या आहेत. त्यामूळे पाण्याचे चांगले नियोजन होईल असे सांगून शासनाच्या वतीने बाजार समितीचे आभार मानले व अभिनंदन केले.
    तसेच शेतक-यांनी जास्तीत जास्त ठिबकचा वापर करावा. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणी जपून वापरणे हाच शेवटचा पर्याय असल्याचे सांगितले. जिल्ह्यात विविध तलाव व बंधा-यातील गाळ काढण्याच्या कामात शेतक-यांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही केले.
    प्रारंभी बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप माने यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  प्रास्ताविकात पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बाजार समितीने 200 टाक्या देण्याचा निर्णय घेतला असून गावच्या क्षमतेनुसार या टाक्या देण्यात येतील, असे सांगितले तर उप सभापती राजशेखर शिवदारे यांनी बाजार समितीच्या कार्याचा आढावा सादर केला. यावेळी महापौर अलकाताई राठोड यांचेही समयोचित भाषण झाले.
 
Top