कळंब -: येरमाळा (ता. कळंब) येथे 'आई राजा उदो उदो' च्‍या गजरात व हलगी, झांजच्‍या निनादात दहा ते बारा लाख भाविकांनी श्री येडेश्‍वरी देवीचे दर्शन घेतले. त्‍याचबरोबर चुना वेचण्‍यासाठी लाखो भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.  दरम्‍यान वाहतुकीचे नियोजन कोलमडल्‍याने तब्‍बल तीन ते चार तास रहदारी विस्‍कळीत झाली होती. देवीच्‍या दर्शनासाठी अलोट गर्दीमध्‍येही अनेक मान्‍यवरांनी हजेरी लावली.
     शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी चुना वेचण्‍याचा व यात्रेचा मुख्‍य दिवस असल्‍याने गुरुवार दि. 25 एप्रिल रोजी संध्‍याकाळीच 10 ते 12 लाख भाविक येरमाळ्यात दाखल झाले होते. शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता देवीची पूजा व महाआरती करुन देवीच्‍या पालखीचे गावाच्‍या दिशेने ‘आई राजा उदो उदो’ च्‍या जयघोषात प्रस्‍थान झाले. यावेळी लाखो भाविक देवीची गाणी म्हणत आनंदाने हालगी व झांजाच्‍या तालावर नाचत होते. पालखी सकाळी दहा वाजता गावात आल्‍यानंतर गावातील नागरिकांनी पालखीचे दर्शन घेऊन फुलांचे हार अर्पण केले. पुढे बाजार चौकातून पालखी चुन्‍याच्‍या रानाच्‍या दिशेने निघाली. प्रत्‍येक चौकांमध्‍ये भाविकांना दर्शन घेता यावे, याकरीता पालखी थांबविली जात होती. पालखी चुन्‍याच्‍या रानात सकाळी अकरा वाजता पोहचली व भाविकांच्‍या आनंदामध्‍ये भरच पडली. त्‍या ठिकाणी भाविकांनी चुन्‍याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकले व आपल्‍या जीवनाचे सार्थक झाल्‍याचे एक वेगळेच समाधान त्‍यांच्‍या चेह-यावर दिसून आले. पुढे चुन्‍याच्‍या रानातून पालखी अंबराईच्‍या दिशेने निघाली व दुपारी सव्‍वा बारा वाजता या पालखीचे अंबराईमध्‍ये आगमन झाले. अंबराईत पालखी ठेवल्‍यानंतर पालखीसोबत आलेल्‍या गावातील मानकरी, नागरीक, भक्‍तांची दर्शन घेण्‍यासाठी खुप मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली. आजपासुन पालखी पाच दिवस अंबराईमध्‍ये मुक्‍कामी असते.
     पालखीचे दर्शन घेण्‍यासाठी बार्शीचे आमदार दिलीप सोपल, आ. राणाजगजितसिंह पाटील, महाराष्‍ट्र परिवहन महामंडळाचे अध्‍यक्ष जीवनराव गोरे, आ. ओमराजे निंबाळकर,     जि.प. उपाध्‍यक्ष संजय पाटील दुधगावकर, सुधीर आण्‍णा पाटील यांच्‍यासह अनेक मान्‍यवरांनी हजेरी लावली.
      यात्रेच्‍या कालावधीत अनुचित प्रकार घडून व यात्रेकरुना कुठलीही अडचण होऊ नये, यासाठी जिल्‍हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक बाळकृष्‍ण भांगे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता.
    येडेश्‍वरी देवीच्‍या दर्शनासाठी येणारा भाविक हा पुणे, मुंबई, औरंगाबादसह संपूर्ण राज्‍यभरातून तसेच परप्रांतातून स्‍वतःच्‍या किंवा खाजगी वाहनाने येतात. यावेळी वाहतुक पोलिसांच्‍या ढिसाळ नियोजनामुळे धुळे-सोलापूर महामार्गावर व कळंब-बार्शी मार्गावर सुमारे तीन तास वाहतुक ठप्‍प होती. त्‍यामुळे वाहतुक शाखेने केलेले नियोजन पूर्णपणे कोलमडल्‍यामुळे याचा नाहक त्रास भाविकांना सहन करावा लागला.
 
Top