बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: सन 2001 मध्‍ये राज्‍यभर राबविलेल्‍या आकृतीबंधानंतर अनेक तंत्रशिक्षक अतिरिक्‍त झाले. त्‍यानंतर शिक्षकांचा समयोजनाचा प्रश्‍न गंभीर झाला. मागील सुमारे बारा वर्षातही यावर उपाय करण्‍यास तंत्रशिक्षण विभाग्राला आलेले अपयश झाकण्‍यासाठी त्‍यांनी शेवटची संधी म्‍हणत निम्‍मश्रेणीवरच काम करावे, असा अट्टाहास करत शेवटी अप्रत्‍यक्ष लेखी धमकीच दिली.
      पूर्व व्‍यावसायिक अभ्‍यासक्रमांतर्गत वेल्‍डींग, प्‍लंबीग, वायरिंग, संगणक, टेक्निकल ड्रॉईंग, फिटींग, ग्रामीण भागाकरीता इतर अभ्‍यासक्रम, वाहन दुरुस्‍ती अशा प्रकारचे व्‍यवसायपूरक अभ्‍यासक्रम राज्‍यातील अनेक शाळांतून शिकविले जातात. हा ऐच्छिक विषय असल्‍याने अनेक शाळा या विषयाचे शिक्षण देत नाहीत.
     शासनाने लागू केलेल्‍या आकृतीबंधानंतर अतिरिक्‍त ठरलेल्‍या शिक्षकांना पूर्ण वेतन अदा करुन इतर ठिकाणी त्‍यांचे समायोजन करण्‍याचा प्रयत्‍न झाला. अनेक शिक्षकांनी न्‍यायालयात धाव घेतली. अनेकांचे समयोजनही झाले. परंतु अनेक वंचित राहिलेल्‍या शिक्षकांचे मागील बारा वर्षापासून समायोजन करण्‍यास आलेले अपयश झाकण्‍यासाठी तंत्रशिक्ष्‍ज्ञण विभागाने चार पर्याय दिले. यात पुणे विभागात समकक्ष पदावर समान वेतनश्रेणीत, समकक्ष पद रिक्‍त नसल्‍यास निम्‍नश्रेणी पदावर, खात्‍यांर्गत इतर प्रादेशिक विभागात समकक्ष पदावर, निम्‍नक्षेणी पद रिक्‍त नसल्‍यास खात्‍यांर्गत इतर प्रादेशिक विभागात यापैकी कोणताही पर्याय त्‍या शिक्षकांनी भरुन द्यायचा होता. सदरच्‍या पर्यायापैकी यौग्‍य पर्याय निवडून एक वर्ष लोटले, परंतु तरीदेखील त्‍या शिक्षकांचे समायोजन करण्‍यास आलेले अपयश झाकण्‍यासाठी शेवट निम्‍नश्रेणी पदावरच काम करावे, अन्‍यथा महाराष्‍ट्र एम्‍प्‍लॉयी ऑफ प्रायव्‍हेट स्‍कूलमधील नियम 1981 मधील 26 (1) नुसार कारवाई करण्‍यात येईल, अशी लेखी पत्रच काढण्‍यात आले. या कलमानुसार तीन महिन्‍यांची नोटीस देऊन कोणत्‍याही शाळेतील कोणत्‍याही शिक्षकाची अन् केंव्‍हाही सेवा समाप्‍त करता येते. सदरच्‍या धमकीमुळे राज्‍यभरातील अतिरिक्‍त शिक्षकावर टांगती तलवार आली आहे. शिक्षकांना सध्‍या मिळत असलेली वेतनश्रेणी व निम्‍न पदावर काम केल्‍यास मिळणारी वेतनश्रेणी यामध्‍ये बरीच तफावत आहे. याबरोबरच निवृत्‍त वेतनश्रेणीतही मोठा फरक पडणार आहे. अनेक वर्षे काम करुन प्रपंचाची जबाबदारी असलेल्‍या शिक्षकांवर नाकर्तेपणे काम करणा-या अधिका-यांच्‍या चुकीच्‍या व बेपवाई वागण्‍यामुळे मनस्‍ताप होत आहे.
 
Top