सोलापूर  -: उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळासह 18 टंचाईग्रस्त गावांसाठी 20 कोटींच्या कायमस्वरुपी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे सर्वेक्षण तातडीने करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी दिल्या.
     जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पालकमंत्र्यांनी आज उत्तर सोलापूर तालुक्यातील टँकरग्रस्त गावांसाठी कायमस्वरुपी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबविणेबाबत बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे,  पंचायत समिती सभापती विजया पाटील, सदस्य महादेव पाटील आणि अविनाश मार्तंडेय यांच्यासह प्रांताधिकारी विजय देशमुख उपस्थित होते.
      बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री प्रा. ढोबळे म्हणाले की, ही सर्व 18 गावे टंचाईग्रस्त टँकरवर अवलंबून असणारी आणि सतत पाण्याची दुर्भीक्ष असलेली गावे आहेत. कायमस्वरुपी नळ पाणीपुरवठा योजनेमूळे भविष्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही. एकरुख तलावात जॅकवेल करुन पाण्याच्या लिफ्टींगद्वारे या योजनेला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी पाच गावांचे गट करुन त्यांचे ईएसआर करुन त्यांचे एमबीआर बनविण्यात येणार आहेत. या सर्व गावांनी सर्वप्रथम सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 10 टक्के लोकवर्गणी ताबडतोब जमा केली पाहिजे. त्यातील काही गावांनी वर्गणी जमा केली असून उर्वरित गावांनी ही रक्कम गट विकास अधिका-यांकडे ताबडतोब भरावी. मजीप्राच्या अधिका-यांनी या सर्व गावांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
       या योजनेंतर्गत या सर्व गावातील लोकांना प्रती माणशी 40 लिटर पाणी योजना सुरु झाल्यावर मिळणार आहे. हे नियोजन पुढील 15 वर्ष डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी वडाळा, मार्डी, सेवालालनगर इ. गावांनी लोकवर्गणीचे धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपुर्त केले. 
    बैठकीचे प्रास्ताविक आणि आभार गटविकास अधिकारी हिळ्ळे यांनी केले. बैठकीस सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
 
Top