नळदुर्ग : उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील विविध सामाजिक स्‍वयंसेवी संस्‍थानी पुढाकार घेऊन पशुधन जगण्‍यासाठी चारा छावण्‍या उभारुन शेतक-यांच्‍या पशुधनाला आधार द्यावा, राज्य शासनाने टंचाईग्रस्‍त भागात चारा छावण्यांना मंजूरी दिली असून त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असे सांगून टंचाईच्‍या काळात पक्ष व मतभेद विसरुन सर्वांनी एकत्रितरित्या काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.   
       तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथे तिरंगा बहुउदृदेशिय सामाजिक संस्था संचलित चारा छावणीस ना. चव्‍हाण यांनी भेट दिली. त्याप्रसंगी ना. चव्हाण हे बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, युवा कार्यकर्ते गोपाळ सुरवसे, तहसीलदार व्‍यंकटेश कोळी, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. आर.आर. चंदेल, डॉ. भातलवंडे, अशोक पाटील, कृष्णांत मोरे, गोविंद चुंगे, सरपंच सिन्‍नाप्‍पा गुंजिटे आदिजण उपस्थित होती.
       यंदा अपु-या पावसामुळे राज्यात दुष्काळदृष्य स्थिती निर्माण झाल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी व चारा नसल्याने पशुधन धोक्यात आले आहे. राज्य शासन राज्यात 800 छावण्या सुरु केल्याने त्यात 6 लाख जनावरे दाखल झाली आहेत.  दररोज जनावरांना 6 किलो सुखे वैरण, एक किलो पशुखादय पुरविण्यात येत आहे. शिवाय जनावरांची आरोग्याची तपासणी, रोगप्रतिबंधात्मक संसर्गजन्य आजारावरही औषधोपचार करण्यात येणार आहे. तेंव्हा पशुपालक व  शेतक-यांनी आपली जनावरे छावणीत दाखल करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन जनावारांसाठी छावण्या सुरु करु इच्छितात त्यास तात्काळ मंजूरी दिली जाईल. पण छावण्या चांगल्या प्रकारे चालावीत. यात जनावरे जगली पाहिजे, पशुधन संवर्धन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे नमूद करुन तहानलेल्या जीवास पाणी व बेरोजगार मजूराना रोजगार उपलब्ध करुन देण्यास शासन बांधिल आहे, असेही पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी शेवटी सांगितले.
    यावेळी तिरंगा बहुउदृदेशिय सामाजिक संस्थेचे अध्‍यक्ष तथा मूर्टा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यवान सुरवसे यांनी छावण्या उभारणीबाबत सविस्तर माहिती दिली. या छावणीत तुळजापूर तालुक्‍यातील होर्टी, शहापूर, जळकोट, मुर्टा, मानमोडी, चिकुंद्रा आदि गावातील समारे 395 जनावरे दाखल झाली असून या जनावरांना सावली निर्माण करणे, चारा, पाणी, खादय वेळोवेळी पुरविण्यात येत असल्याची माहिती दिली. याप्रसंगी डॉ. चंदेल म्हणाले की, सध्या जिल्हयात कळंब येथे 4 छावण्या, भूम येथे 12 व तुळजापूर तालुक्यात दोन छावण्या कार्यान्वित असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भैरवनाथ कानडे यांनी केले.
 
Top