बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी शहरवासियांना दि. 20 जुलै अखेर उजनी जलाशयातून पाणी पुरवठा करणारा टंचाई कृती आराखडा आमदार दिलीप सोपल यांच्‍या मार्गदर्शनाखाली बार्शी नगरपरिषदेने तयार केल्‍याची माहिती राष्‍ट्रवादीचे गतनेते नगरसेवक नागेश अक्‍कलकोट यांनी पत्रकारांना दिली.
    शहराला उन्‍हाळा संपेपर्यंत पाणी टंचाई जाणवू नये, यासाठी शहराच्‍या पाणीपुरवठा नियोजनाच्‍या अनुषंगाने सोपल यांच्‍या मार्गदर्शनाखाली नगराध्‍यक्ष कादर तांबोळी, उपनगराध्‍यक्ष राहुल कोंढारे, पाणीपुरवठा समितीचे सभापती देविदास शेटे, राष्‍ट्रवादीच्‍या नगरसेवकांनी एकत्रितपणे संभाव्‍य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. याबाबत आमदार दिलीप सोपल यांनी सातत्‍याने शासन दरबारी पाठपुरावा करत उजनी जलाशयातील पाणीसाठा बार्शीकरांसाठी राखीव ठेवण्‍यासाठी प्रयत्‍न केले आहेत.
    दि. 20 जुलै अखेर उजनी जलाशयातील पाणी बार्शीकरांना मिळण्‍यासाठी 150 मीटर लांबीची चारी जलाशयात खोदणे, दीड किलोमीटर लांबीची धरण क्षेत्रात जलवाहिनी टाकून 8 विद्युत पंपाद्वारे पाणी खेचणे, या कामासाठी जिल्‍हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्‍यावतीने राज्‍य शासनाकडे सादर करण्‍यात आलेल्‍या दीड कोटी रुपयांच्‍या टंचाई आराखड्यास आमदार सोपल यांनी मंजूरी मिळ‍वली आहे.
    यामुळे उजनी जलाशयातील पाणी पातळी 481 मीटरपर्यंत गेल्‍यानंतरही बार्शीकरांना पाणी मिळण्‍यास मदत होणार आहे. या संपूर्ण कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्‍याधिकारी श्रीकांत मायकलवार व जलदाय व्‍यवस्‍था अभियंता अजय व्‍हनखांबे यांच्‍या नियंत्रणाखाली सध्‍या करमाळा तालुक्‍यातील कंदर येथे जलाशयात चारी खोदून गाळ काढण्‍याच्‍या कामाला सुरुवात करण्‍यात आली आहे.
    तसेच नगर‍परिषद मालकीच्‍या दहा विहिरी वितरण नलिकांना जोडणे, टँकर भरण्‍यासाठी स्‍टॅण्‍डपोस्‍ट काढणे तसेच लक्ष्‍मीतीर्थ विहीर, बेदराई विहीरीसह पाच विहीरीतील गाळ काढणे, पाथरी जलाशयातून पाण्‍याची पातळी खाली गेल्‍याने पंपींग मशिनद्वारे पाणी उचलणे या कामांना मंजूरी घेण्‍यात आली आहे. परिस्थितीनुसार ही कामे देखील हाती घेण्‍यात येतील. तसेच टँकरद्वारे पाणी पुरवठयाची निविदा मंजूर असून टंचाई काळात नगरपरिषद खासगी टँकरद्वारे देखील पाणी पुरवठ्याचे नियोजन करत आहे.
    आमदार दिलीप सोपल यांच्‍या दूरदृष्‍टीमुळे आज दुष्‍काळी स्थितीतही सर्वत्र भीषण पाणीटंचाई जाणवत असताना बार्शी शहराला मात्र पुरेसे पाणी उजनीतून मिळत आहे. राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याकडून सोपल यांनी शंभर टक्‍के शासीय अनुदानातून दहा कोटी रुपये मिळवून माढा तालुक्‍यातील रिधोरे ते आरडानाला ही अडीच किलोमीटर लांबीची सतत गळतीग्रस्‍त जलवाहिनी बदलून नवीन टाकली. तसेच नवीन पंपींग मशिनरी बसवली.
    आमदान निधीतून शहरात सुमारे 45 किलोमीटर लांबीची अंतर्गत जलवाहिनीचे कामे केली. काटकसरीच्‍या उपाययोजनेतून सुमारे दहा महिन्‍यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्‍यानेच आज पाण्‍याबाबत बार्शीकर समाधानी आहेत. तर सुभाषनगरस्थित गावतळ्यातील गाळ उपसा केल्‍याने तिथे पाणी साठवण क्षमता वाढून संपूर्ण शहर परिसरातील पाणी पातळी कायम ठेवल्‍याने आज बार्शीकर पाण्‍याबाबत निवांत आहेत, असेही यावेळी अक्‍कलकोटे यांनी सांगितले.
 
Top