बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) –: बार्शी तहसिलच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक अजब नमुना समोर आला असून सध्याच्या जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ऐवजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच छायाचित्र असलेला डिजिटल तहसिलसमोर लावत निष्काळजीपणाचे प्रदर्शन केले आहे.
           याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून लोकाभिमुख योजनांची गतिमान अंमलबजावणी या महत्वाकांक्षी योजनेची माहिती असलेल्या डिजिटलचे प्रसिध्दीकरण प्रत्येक तहसिलसमोर करण्यात आले. यामध्ये विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांचे छायाचित्र प्रसिदध केले असून सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ऐवजी त्यांच्या पूर्वीचे असलेल्या जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांचे छायाचित्र प्रसिदध करुन गलथान कारभाराचे प्रदर्शन केले आहे.
           सदरचा डिजिटल फलक हा या दोन दिवसात लावण्यात आला असून जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी पदभार स्विकारुन एक महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. सदरच्या डिजिटलची प्रिंट यापूर्वीच तयार केली असल्यास केवळ छायाचित्राच्या जागी सध्याचे जिल्हाधिकारी यांचे छायाचित्र चिटकविण्यास केवळ 80 ते 100 रुपये खर्च झाले असते. परंतु सदरची गोष्ट कोणत्या अधिकारी अथवा कर्मचा-यांच्या लक्षात येत नसल्याने किती निष्काळजीपणाने कारभार चालतो, हे लक्षात येते. बार्शी तहसिलचे तहसिलदार हे रजेवर असल्याने त्यांच्या जागी प्रभारीची नियुक्ती, बार्शी पोलीस निरीक्षक आजारी असल्याने त्यांच्या जागी प्रभारी पोलिस निरीक्षक, बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एस.के. देसाई हे निवृत्त झाल्याने सदरच्या जागी प्रभारी मुख्याधिकारी अशा पध्दतीने सर्व महत्त्वाच्या जागी प्रभारींचा कारभार सुरु असून कार्यक्षम अधिका-यांची उणीव भासत आहे. बार्शी तहसिलमध्ये दररोज वेगवेगळया घटना समोर येत असल्याने बेपवाईने सुरु असलेल्या कामकाजाबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. पुरवठा विभागातील हेतपुरस्सर अनागोंदी कारभार, सर्वसामान्यांची पिळवणूक व अडवणूक, तलाठी कार्यालयातील अजब कारभार, महसूल विभागाची वाळू तस्कररांवरील मेहेरबानी, भूमि अभिलेखमधील सावळागोंधळ, जमीन खरेदी विक्रीच्या रजिस्ट्रार कार्यालयातील दलालांची गर्दी, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याची छळवणूक, गावातील पाट्या अरुंद रस्त्यावरील व्यापा-यांच्या मालाची चढ-उतार करणा-या वाहन चालकांची बेपवाई अशा विविध प्रकारच्या घटनांनी बार्शी शहराचा चेहरा बदलला आहे. बार्शी शहरात बेशिस्त व मनमानी कारभारामुळे तसेच अतिस्वार्थी प्रवृत्तीमुळे आंधळं दळतंय आण कुत्र पिठ खातयं अशी अवस्था झली आहे.
 
Top