बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: दरवर्षी आपण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्‍साहाने साजरी करतो. परंतु त्‍यांनी समाजाच्‍या विकासासाठी मांडलेले अमूल्‍य विचार केवळ पुस्‍तकातच राहतात. ते तळागाळातील वंचितांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत आर.एस.एम. उद्योग समूहाचे संस्‍थापक राजेंद्र मिरगणे यांनी व्‍यक्‍त केले.
    भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्‍त शहरातील दलित महासंघ, भीमनगर येथील मध्‍यवर्ती मंडळ, 422 येथील रमामाता नगर, पंचायत समितीजवळील भिमक्रांती तरुण मंडळ यासह विविध ठिकाणी त्‍यांच्‍या तैलचित्राला व अर्धपुतळ्यास पुष्‍पहार अर्पण करुन त्‍यांच्‍या अभिवादन करण्‍यात आले. त्‍यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधिक्षक रोहिदास पवार, बार्शीचे नूतन पोलीस निरीक्षक एस.आय. चाऊस, राजेंद्र मिरगणे, हॉटेल असोसिएशनचे अध्‍यक्ष शिवाजी पवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेस पुष्‍पाहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सुहास मोहिते, बाळासाहेब गव्‍हाणे, शिरीष घळके, दत्‍ता जाधव, शाहू गायकवाड, अविनाश पोकळे, टी.एस. खुडे, मदन दंदाडे, भाऊनगर, कृष्‍णा उपळाईकर, अ.भा. मराठा सेवा संघाचे आबासाहेब काळे, दलित महासंघाचे जिल्‍हाध्‍यक्ष सुनिल अवघडे, तालुका कार्याध्‍यक्ष पांडुरंग झोंबाडे, शहर उपाध्‍यक्ष सुनिल झोंबाडे, तालुकाध्‍यक्ष निलेश खुडे, तालुका उपाध्‍यक्ष कैलास अडसूळ, रानबा झोंबाडे, ज्ञानेश्‍वर शिंदे, प्रवीण शेंडगे, मुकूंद शेंडगे, अलोक गवळी, खंडू वाघमारे, विनोद साठे, प्रशांत कांबळे, शरिफ शेख, अमोल गायकवाड, मोहसिन पठाण, जमीर शेख, साजिद पठाण, हरिभाऊ कांबळे, बंटी गायकवाड आदीजण उपस्थित होते.
    पुढे बोलताना मिरगणे म्‍हणाले की, ज्‍यांचा विकास झाला त्‍यांनी इतरांना प्रेरित करुन त्‍या मार्गाने जाण्‍यास प्रवृत्‍त करावे, इतर समाजाच्‍या बरोबरीने वंचित समाजाचा विकास होण्‍यासाठी मांडलेले डॉ. बाबासाहेबांचे विचार आजही अनेकांपर्यत नीटपणे पोहोचलेले दिसत नाहीत. ते शेवटच्‍या टोकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्‍याकरीता सामाजिक संघटनांनी समाज प्रबोधनाचे विविध प्रकारच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करुन प्रबोधन करावे व दुर्लक्षित वंचितांना न्‍याय मिळवून द्यावा, हिच महामानवाला मानवंदना होईल.
    यावेळी दलित मुस्लिम तरुण बांधवांनी राजेंद्र मिरगणे यांच्‍या समवेत निळे व हिरवे झेंडे घेऊन काढलेल्‍या रॅलीने शहरात वेगळे वातावरण निर्माण झाले.

 
Top