उस्मानाबाद :- पाणीटंचाईचा युध्द पातळीवर मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री  मधुकरराव चव्हाण यांनी केले.
      उमरगा येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित तालुकास्तरीय पाणीटंचाई व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत्‍ विकास कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार बसवराज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, पंचायत समिती सभापती अक्षरताई सोनवणे, उपसभापती बाबा काजी, बाबूराव पाटील, रामकृष्णपंत खरोसेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भालेराव, कैलास शिंदे आदि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
         पालकमंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, सध्याची टंचाई लक्षात घेता जनावरांसाठी चारा, पाण्याची सोय करावी. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन दयावा. पाणीटंचाईवर उपाययोजना  करण्यासाठी पैशाची कमरता कमी पडू दिली जाणार नाही. जनतेला विहीर, विंधन विहीरीतून पाणीपुरवठा करावा. नादुरुस्त विंधन विहिरींची त्वरीत दुरुस्ती करावी. जुन्या बंद पडलेल्या मोटारी काढून त्याठिकाणी नवीन मोटारी बसवाव्यात. जनावरांसाठी पिण्यासाठी हौद बांधुन पाणीपुरवठा करावा. आवश्यक तेथे जनावरांसाठी छावण्या उभाराव्यात. दानशुर व्यक्ती, संस्थांनी  जनावरांसाठी  पिण्याच्या पाण्यासाठी टाक्या पुरवाव्यात,असेही ते म्हणाले.
       रोजगार हमी योजनेसंदर्भात बोलतांना श्री. चव्हाण म्हणाले की, सध्या शेतीचे काम संपल्याने गावात शेतमजूर बसून आहेत. त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी कृषि विभागाने नाला सरळीकरण, शेततळी, हरीयाली योजना तसेच विहीरींची कामे सुरु करुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन दयावेत. याशिवाय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी  वैयक्तिक लाभाच्या योजनेस गती देण्याची  सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला केली.
     जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्हट्टे म्हणाले की, उमरगा तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. तहालेल्या जनतेस व जनावरांस पिण्याचे पाणीपुरवठा करावा, आवश्यक तेथे खाजगी विहीरी अधिग्रहण कराव्यात. पाझर तलाव व जलसंधारणाची कामे घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
    यावेळी तहसीलदार दिनेश झांपले, गटविकास अधिकारी बी. बी. खंडागळे, कृषी विभागाचे श्री. मोरे, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता बी. बी. चव्हाण यांनी पाणी पुरवठा टंचाईबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.  
    या बैठकीस सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक, आदिजण उपस्थित होते. 
 
Top