चेअरमन सीताराम वाघमोडे
सांगोला (राजेंद्र यादव) : रस्ते आणि बंदरे बांधण्याच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या आऋष इंजिनियर्स प्रा.लि. ने वीजनिर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून, राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात लवकरच या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. आगामी 22 महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वीत होणार असल्याची माहिती आऋष इंजिनियर्सचे चेअरमन व कॉँग्रेसचे नेते सीताराम वाघमोडे यांनी दिली.
    राजस्थान सरकारच्या अंतर्गत येणार्‍या राजस्थान रेनीवेबल एनर्जी कॉर्पोरेशन लि. सोबत नुकताच आऋष इंजिनियर्सचा या प्रकल्पासाठी करार झाला आहे. सुमारे 1200 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून 150 मेगावॅट वीजिनिर्मती होणार आहे. यासाठी राजस्थान सरकारने आऋष इंजिनियर्स प्रा.लि. या कंपनीला 40 वर्षांच्या करारावर 1800 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. जर्मनीतील जागतिक दर्जाच्या इनरकॉन कंपनीकडून या प्रकल्पासाठी टर्बाईनचा पुरवठा करण्यात येणार आहे. राजस्थानमध्ये हिमालयाकडून येणारा वारा वाहतो, त्यावरच पवनचक्क्‌यांच्या माध्यमातून ही वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. जैसलमेर येथे अशा प्रकारचे देशातील सर्वात जास्त प्रकल्प असून यापूर्वीही अशाच प्रकारे 2000 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. 2 मेगावॅट वीजनिर्मिती केल्यास त्यातून 23 लाख युनिट वीजनिर्मिती होते. ही वीज राजस्थान इलेक्ट्रीसिटी बोर्ड 5 रुपये 98 पैसे प्रति युनिट दराने विकत घेणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून उभारण्यात येणार्‍या 150 पवनचक्क्‌यांची देखभाल इनरकॉन कंपनीशी झालेल्या करारानुसार 20 वर्षे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वीजनिर्मिती प्रकल्पासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री डॉ. बलराम जाखड, केंद्रीय अपारंपरिक ऊर्जामंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राजस्थानचे ऊर्जामंत्री डॉ. जितेंद्रसिंग आदींचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही वाघमोडे यांनी सांगितले.
 
Top