बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : तमाशा थिएटर चालकांविरूध्‍द वरिष्‍ठ पातळीपर्यंत तक्रारी दाखल करणा-या शिवसेनेच्‍या बार्शी शहर उपप्रमुखास उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी दोन वर्षासाठी सोलापूर, पुणे व उस्‍मानाबाद जिल्‍ह्याबाहेर तडीपारचे आदेश पारीत केले आहे.
    सदरच्‍या हद्दपारीच्‍या कारवाईबाबत विकी जव्‍हेरी यांच्‍याशी बोलताना त्‍यांनी सांगितले, मागील दोन वर्षामध्‍ये कसलेही गुन्‍हे दाखल झाले नाहीत. शिवसेना पक्षाचा पदाधिकारी असल्‍याने राजकीय आकसपोटी आपल्‍यावर खोटे गुन्‍हे दाखल केले जातात. तमाशाच्‍या नावाखाली चालू असलेल्‍या गैरप्रकाराची आपण लेखी तक्रार दिली होती. दाखल झालेल्‍या बहुतांश खटल्‍यांचा निकाल झाला आहे. गु.र.नं. 239/09 या केसचा निकाल झाला असून निर्दोष मुक्‍तता झाली आहे. गु.र.नं. 147/2011 चा खटला तडजोडीने सुटत आहे. गु.र.नं 184/12 ही जमावातील केस असून त्‍यात केवळ राजकीय पदाधिकारी म्‍हणून चुकीच्‍या पध्‍दतीने गावण्‍यात आले आहे. चॅप्‍टर केसमध्‍ये सरकारी पक्षाने कोणताही पुरावा दाखल केला नाही. इतर खटले हे न्‍यायप्रविष्‍ठ आहे. अद्यापपर्यंत कोणत्‍याही गुन्‍ह्यामध्‍ये शिक्षा झालेली नाही. तत्‍कालीन पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावले यांच्‍याविरूद्ध वरिष्‍ठ अधिका-यांकडे केलेल्‍या लेखी तक्रारीमुळे खोटा अहवाल पाठवून केवळ त्रास देऊन त्‍याच्‍या बदल्‍यात केलेल्‍या तक्रारी बिनशर्त मागे घेण्‍याचा उद्देश दिसून येत आहे. राजकीय पक्षाचा पदाधिकारी व सामाजिक भान ठेवत अनेक आंदोलने, मोर्च इत्‍यादींच्‍या माध्‍यमातून लोकशाही मार्गाने सामाजिक बांधीलकीची जपणूक केली आहे. प्रतिष्ठित पदाधिका-यांची वर्तणूक चांगली असल्‍याचे लेखी दिले असून आपल्‍याला केवळ मानसिक त्रास देण्‍याच्‍या उद्देशाने कारवाई केली आहे. इतर राजकीय पक्षाचे अनेक संबंधित व्‍यक्‍ती यांना वैयक्तिक हितसंबंध जोपासून पाठबळ दिले जाते, तसेच त्‍यांना हवे तसा अहवाल पाठवून भ्रष्‍टाचारी राज्‍यकर्त्‍यांना पाठबळ दिले जाते.
    उपविभागीय दंडाधिकारी यांनी पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्‍या अहवालानुसार विकी जव्‍हेरी यांच्‍याविरूद्ध प्रतिबंधात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे. राजकीय पक्षाचा फायदा घेऊन घातक शस्‍त्र स्‍वतः जवळ बाळगून दहशत निर्माण करीत आहे. त्‍याच्‍या वागण्‍यामुळे शहर व परिसरातील सर्वसामान्‍य नागरिकांचे जीवन विस्‍कळीत झाले आहे. त्‍याच्‍याविरूद्धच्‍या कारवाया निरुपयोगी झाल्‍यामुळे कायद्याचा धाक अथवा भिती त्‍याला राहिली नसल्‍याने गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीस आळा घालण्‍यासाठी व त्‍याच्‍यात सुधारणा होण्‍यासाठी सोलापूर, पुणे व उस्‍मानाबाद जिल्‍ह्याच्‍या हद्दीबाहेर दोन वर्षाच्‍या कालावधीसाठी तडीपार करण्‍यात येत आहे.
 
Top