नळदुर्ग -: पाण्‍याच्‍या प्रश्‍नाने उग्र स्‍वरुप धारण केले असून मानवासह मुक्‍या प्राण्‍याना कठीण परिस्थितीमधून आज जावे लागत आहे. सामाजिक संस्‍थांनी पुढाकार घेऊन समाजातील चित्र बदलण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांनी केले.
      प्रज्ञावंत बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्‍थेच्‍यावतीने विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केलेल्‍या व्‍यक्‍तीना बोधिसत्‍व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्‍यस्‍तरीय समता पुरस्‍काराचे वितरण नळदुर्ग येथील आपलं घर येथे रविवार रोजी करण्‍यात आले. यावेळी पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण हे बोलत होते. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी हे होते. राष्‍ट्रसेवा दलाचे तथा ज्‍येष्‍ठ विचारवंत पन्‍नालाल सुराणा, निवृत्‍त विभागीय समाजकल्‍याण अधिकारी सॉलोमन कांबळे, नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार, उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्‍हाण, न.प.च्‍या बांधकाम समितीच्‍या सभापती सौ. लक्ष्‍मी खारवे, नगसेवक दयानंद बनसोडे, आपलं घरचे व्‍यवस्‍थापक शिवाजी पोतदार, प्रमोद कांबळे, धरित्री विद्यालयाचे मुख्‍याध्‍यापक सुरेश कांबळे आदीजण व्‍यासपीठावर उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्‍या प्रारंभी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. यानंतर संस्‍थेचे सचिव दादासाहेब बनसोडे यांनी मान्‍यवरांचा सत्‍कार केला.    यावेळी बोलताना ना. चव्‍हाण म्‍हणाले की, सध्‍याची परिस्थिती अतिशय कठीण आहे. अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्‍यासाठी सर्वांनी एकत्रित येवून काम करणे गरजेचे आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणा-या व्‍यक्‍तींचा पुरस्‍कार रुपाने गौरव करुन प्रज्ञावंत संस्‍थेने केलेले कार्य कौतुकास्‍पद आहे.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचाराची प्रेरणा घेवून कार्य करणा-या दुष्‍काळी परिस्थितीत कुपोषित मुलांना एकत्रित करुन दुष्‍काळ संपेपर्यंत त्‍यांचे पोषण करण्‍यासाठी सामाजिक संस्‍था व कार्यकर्त्‍यांनी पुढे येणे गरजेचे आहे. अशा प्रकारची कुणी तयारी दर्शविली तर आपण दोनशे मुलांचे संगोपन करण्‍यासाठी तयारी असल्‍याचे माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांनी सांगितले.
    या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संस्‍थेचे सचिव दादासाहेब बनसोडे तर अध्‍यक्ष विठ्ठल जेटीथोर यांनी आभार मानले. सुत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.
 
Top