बार्शी (मल्लिकार्जून धारुकर) -: बार्शी जवळील गाताची वाडी येथील कांडी कोळशाच्‍या कारखान्‍याला लागलेल्‍या आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्‍याची माहिती कारखान्‍याचे मालक विजयकुमार घोलप यांनी दिली.
    सदरची घटना मंगळवार रोजी सकाळी सव्‍वा दहा वाजण्‍याच्‍या सुमारास घडली. सदरच्‍या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. सदरची घटना घडल्‍यानंतर बार्शी, सोलापूर, तुळजापूर, उस्‍मानाबाद, कुर्डवाडी आदी ठिकाणाहून अग्निशमान विभागाची वाहने येवून आग आटोकात आणण्‍याचा प्रयत्‍न करीत होती. सोलापूर येथील एम.आय.डी.सी. अग्निशमन विभागाच्‍या तरबेज कर्मचा-यांनी अत्‍यंत कुशलतेने काम करुन इतर विभागातील कर्मचा-यांना काम कसे करावे व आग कशाप्रकारे आटोक्‍यात आणायची, याचे जणू प्रशिक्षणच दिल्‍याचे चित्र पहावयास मिळत होती. अंगावर शहारे आणणारे दृश्‍य यावेळी जमलेल्‍या लोकांनी पाहिले.
    याबाबत अधिक माहिती अशी की, औद्योगिक वसाहत क्रमांक तीनच्‍या बाजू असलेल्‍या लक्ष्‍मी कृषी ऊर्जा व यशराज बायो एनर्जी या विजयकुमार घोलप व श्‍वेता घोलप यांचे फर्म असून एकाच ठिकाणी जवळजवळ होत्‍या. या ठिकाणी शेंगा टरपल, हरभरा, भुस्‍सा, बगॅस, कडबा, लाकडी भुस्‍सा इत्‍यादी प्रकारच्‍या मालाचे मिश्रण करुन कांडी कोळसा बनविण्‍यात येतो. सदरच्‍या कोळशाला अनेक छोट्या मोठ्या शहरातून चांगली मागणी असल्‍याने सदरच्‍या व्‍यवसायात मोठी उलाढाल होते. मागील आठ ते नऊ वर्षापासून घोलप यांनी सदरचा व्‍यवसाय केला आहे. त्‍यांच्‍याजवळ याच्‍यासाठी लागणा-या प्रोसेसींग कन्‍व्‍हर्ट व कांडी बनविण्‍यासाठी लागणा-या दोन मशिनरी तसेच वाहतुकीसाठी लागणारी वाहने पत्र्याचे शेड इत्‍यादी उपलब्‍ध होते. सदरच्‍या घटनेनंतर बार्शी शहरात विविध प्रकारच्‍या चर्चा रंगल्‍या. त्‍यात नेहमीप्रमाणे कोणीतरी मोठ्रया विमासाठी आग लागल्‍याचे नाटक केले असेल इथपर्यंत टोकाची चर्चा सुरु होती.
    सदरच्‍या घटनेचा पंचनामा बार्शी तहसिलच्‍या अधिका-यांमार्फत करण्‍यात आला. परंतु त्‍याची आकडेवारी देण्‍यास त्‍यांना विलंब लागत होता.
 
Top