उस्मानाबाद -: समस्याग्रस्त व पीडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून राज्यस्तर, विभागीय स्तर आणि जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्याचे ठरविण्यात आलेले आहे.  त्या अनुशंगाने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या  सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे. सोमवार, दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हा उपक्रम होणार आहे. याचबरोबर तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याचा चौथा सोमवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुटी आल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस महिला लोकशाही दिन म्हणून पाळण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
      जिल्हास्तरावरील लोकशाही दिनाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सदस्य म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी,  प्रशासकीय अधिकारी (वरिष्ठ महिला) वरिष्ठ पोलिस अधिकारी (महिला) राहणार असून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
    तालुकास्तरावरील महिला  लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या चवथ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांक व अर्जाची प्रत जिल्हास्तरीय लोकशाही दिनात देणे आवश्यक असेल. जर प्रकरण थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित असेल तर तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन  क्रमांक व अर्जाची प्रत आवश्यक राहणार नाही. या लोकशाही दिनात महिलांची वैयक्तीक स्वरुपाची तक्रार, निवेदन विहीत नमुन्यात स्विकारले जाणार आहेत. अर्जाचा विहीत नमुना जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय प्रशासकीय इमारत, गाळा नंबर.15 तळमजला उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील.
       या महिला लोकशाही दिनाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यु. पी. बिरादार यांनी केले आहे.   

 
Top