सोलापूर -: पत्रकारांनी वाईट गोष्टींवर टिका करुन समाजातील वास्तव समोर आणून समाजाला जागृत करावे. असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
     जिल्हा परिषदेतील यशवंतराव सभागृहात आज जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ग्रामीण पत्रकार कार्यशाळेचे उदघाटन पालकमंत्री प्रा. ढोबळे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जि.प.अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, विरोधी पक्षनेते संजय पाटील, समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे, महिला बालकल्याण सभापती जयमाला गायकवाड, कृषी सभापती जालींदर लांडे, आरोग्य सभापती शिवानंद पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, दै. लोकमतचे संपादक राजा माने, दै. कृषीवलचे संपादक संजय आवटे, दै. तरुण भारतचे संपादक नारायण कारंजकर, ज्येष्ट पत्रकार अरविंद जोशी उपस्थित होते.
     उदघाटनपर भाषणात पालकमंत्री प्रा. ढोबळे म्हणाले की, संतांनी अध्यात्मिक दाखल्यांनी समाज घडविला तर पत्रकारांनी लेखनीतून समाजाची जडणघडण करण्याचा वसा घेतला आहे. ग्रामीण पत्रकारांनी कोणत्या मार्गाने वाटचाल करावी याचे उत्तम मार्गदर्शन या कार्यशाळेच्या रुपाने होत आहे. माहिती, ज्ञान, शहाणपण याचे नेमके पणाने वर्गीकरण म्हणजे पत्रकारीतेचं मुळ आहे. माहितीचे रुपांतर ज्ञानात करताना पत्रकारांना विविध संदर्भ शोधावे लागतात. अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. तरीही पत्रकार जीवनावर भाष्य करुन सत्य समोर आणतात. प्रत्येक गोष्टीचे पृथ:करण करुन प्रत्येक घटकाला असणारे पैलू समाजासमोर आणतात असाही उल्लेख त्यांनी केला.
    सोलापूर जिल्हयातील पत्रकार जांभेकरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी चौकस, सव्वसाची आणि निर्भिडपणे पत्रकारीता करीत आहेत. चांगल्या कामाचे कौतूक करत आणि अपप्रवृत्तींवरती लेखनीतून भाष्य करुन प्रसंगाचे नेमकेपण बातमीतून समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज सहा ककारांचा उलगडा करीत शास्त्रशुध्द बातमीची गरज असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. जिल्हयातील दुष्काळी परिस्थीती पाहता ट्रिपल आर आणि ट्रिपल पी या पाणलोट योजनेतून पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून पाण्याचे महत्व समजून घेण्याचा समाजाने प्रयत्न करावा, असेही पालकमंत्री शेवटी म्हणाले.
     अध्यक्षा डॉ. माळी आपल्या भाषणात म्हणाल्या की, पत्रकारांनी सकलजनहितार्थ भुमिका घेत चांगुलपणाचा गौरव, वाईटावर टिका करीत शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी पत्रकारांवरती आहे. पत्रकारांनी तटस्थपणे बातमीचे लेखन करुन पत्रकारीतेचा चौथा स्तंभ अधिक मजबुत केला पाहिजे.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार दत्ता मोकाशी, प्रास्ताविक पत्रकार विजय देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन सभापती कांबळे यांनी केले. कार्यशाळेस पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top