प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे म्हटले जाते. त्यानुसार आता आपण या आधुनिक यशस्वी सावित्रींच्या मागे एका पुरुषाचा हात आहे असेही म्हटले पाहिजे असे गौरवोदगार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  नुकतेच काढले.
         उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे नुकताच 2012-13 चा सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्रात संपन्न झाला. या कार्यक्रमात श्रीमती श्रृती श्रीकांत नाझिरकर, शालीनीताई राधाकृष्ण विखे-पाटील, उर्मिला श्रीपाद करमरकर, अनिता इंद्र ओस्तवाल, लता प्रल्हाद उपरेंचवार, वेणूताई ज्ञानेश्वर ढवगाये यांना सावित्रीबाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचा हा माहितीपर लेख…   
       सावित्रीबाई फुले यांचे नुसते नाव घेतले तरी एक धाडसी स्वाभिमानी स्त्री आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.  सावित्रीबाईंनी एकोणिसाव्या शतकात स्त्री शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. ज्यावेळी स्त्रियांनी शिक्षण घेणे म्हणजे नरकात जाणे असे समजले जात होते,  त्या काळी स्त्रियांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे, त्यांचा आत्मसन्मान जागृत करण्याचे, काम अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत सावित्रीबाईंनी केले अशा शब्दांत सावित्रीबाईंची महती सांगून उपमुख्यमंत्र्यांनी पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन केले व उपरोक्त गौरवोद्गार काढले.
       चंगळवादामध्ये संस्कार व नैतिकता हरवत चालली आहे का अशी भीती वाटू लागली आहे. स्त्रीकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जाता कामा नये यासाठी आता स्त्रियांनीच पुढे आले पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी महिलांनी तक्रारी करायला पुढे आले पाहिजे. स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन स्वत:चा आत्मसन्मान वाढविला पाहिजे.  यासाठी महिला बचत गटाचे काम वाढले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांत महिला चांगले काम करीत आहे. संधी मिळाली की त्या संधीचे सोने मुलांपेक्षा मुलीच अधिक करतात.  हे दहावीं बारावीचे निकाल पाहिले तरी आपल्या लक्षात येते असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

क्रांतिज्योती, सूर्यकन्या
      सावित्रीबाईंना आपण क्रांतिज्योती, सूर्यकन्या अशी विशेषणे लावतो. कारण आज सुध्दा ज्या गोष्टी करण्याचे धैर्य समाजात नाही त्या गोष्टी करण्याचे धैर्य त्यांनी दीडशे वर्षापूर्वी दाखविले.  सावित्रीबाईंनी पहिली महिला विद्यार्थींनी, महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा सन्मान मिळविण्याकरिता मोठा संघर्ष केला असे सांगून छगन भुजबळ यांनी सर्व पुरस्कारांर्थींचे अभिनंदन केले.
    या पुरस्कारांमुळे जबाबदारी अधिक वाढली असल्याची जाणीव करुन देत या पुरस्कारापासून इतरांनी प्रेरणा घेतली तर पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा कायम राहील असा विचार त्यांनी मांडला. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, आज महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले असले तरी त्यांचे प्रश्न कमी झालेले नाहीत. स्त्री भ्रूणहत्या, मुलींची छेडछाड, हुंडाबळी महिलांचे लैंगिक शोषण या सर्व समस्यांना जबाबदार पुरुषच आहेत त्यामुळे जागर जाणीवांच्या सारख्या कार्यक्रमांतर्गत स्त्रियांप्रमाणे पुरुषांकरिताही मेळावे घेतले जावेत अशीही सूचना त्यांनी केली. 
     तर दुर्गम भागात वंचित घटकातील मुलांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा निरलसपणे पोहोचविणाऱ्या सहा महसूल विभागातील आधुनिक सावित्रींचा आद्यशिक्षिका व समाजसेविका, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो, पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. 


नवी उमेद
     पुडीचा दोरा सुध्दा वाया न जाऊ देणाऱ्या महिला संधी मिळाली तर संधीचे सोने केल्याशिवाय राहात नाहीत परंतु सुशिक्षित घरातही मुलींच्या भावनाचा फारसा विचार होताना दिसत नाही ही परिस्थिती बदलण्यासाठी कार्य करण्याची नवी उमेद मला या पुरस्काराने दिली आहे. अशी भावना पुरस्कारार्थींची प्रतिनिधी म्हणून बोलताना श्रीमती शालीनीताई विखे-पाटील यांनी व्यक्त केली. माझे कुटुंब जरी राजकारणात असले तरी प्रत्यक्ष राजकारणाशी माझा संबंध मी जिल्हा परिषदेचे कार्य करायला सुरुवात केली तेव्हाच आला. त्यानंतर  बचत गटाचे कार्य करताना महिलांच्या अनेक समस्या कळल्या. आता सावित्रीबाईं फुले यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने मला अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे अशीही भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती
     याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर, उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. बी. आर. गायकवाड, सहसंचालिका मंजुषा मोळवणे, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या खेळाडू कोल्हापूरची राही सरनोबत असो की नाशिकची सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत असो अथवा कलाक्षेत्रातील औरंगाबादची मिताली जगताप वा कोल्हापूरची उषा जाधव या अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या अभिनेत्री असोत या सर्व महिलांनी आपल्या कामगिरीने राज्याचा सन्मान वाढविला आहे. त्यांचे कार्य असो की सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेल्या या माता भगिनी असोत या सर्वांनीच आपआपल्या क्षेत्रात केलेले कार्य, दिलेल योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच त्यांच्या कार्यकर्तृत्वास हा सलाम…


--राजू पाटोदकर
patodkar@yahoo.co.in
 
Top